पावसाळा लांबला तरी ‘नो टेन्शन’; जायकवाडी धरणात ३० टक्के, हर्सूल तलावात १६ फूट पाणी!

By मुजीब देवणीकर | Published: June 24, 2023 01:55 PM2023-06-24T13:55:01+5:302023-06-24T13:56:08+5:30

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

Even if the rainy season is waited, 'no tension' for Chhatrapati Sambhajinagar;s citizens; 30 percent in Jayakwadi dam, 16 feet water in Hersul Lake! | पावसाळा लांबला तरी ‘नो टेन्शन’; जायकवाडी धरणात ३० टक्के, हर्सूल तलावात १६ फूट पाणी!

पावसाळा लांबला तरी ‘नो टेन्शन’; जायकवाडी धरणात ३० टक्के, हर्सूल तलावात १६ फूट पाणी!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शहराची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात अजून ३० टक्के पाणीसाठा आहे. धरणातील पाणीपातळी खालावल्याने महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीत सुरू करणारा ४५० अश्वशक्तीचा सहावा पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पंप सुरू झाल्यास शहराला पाच एमएलडीपर्यंत जास्त पाणी मिळेल. जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात १६ फूट पाणी शिल्लक आहे.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावत असते. सध्या १३० एमएलडी पाणी दररोज शहरात येत आहे. मागील वर्षी जुलै महिन्यातच धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती. यंदा पाऊसच लांबल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. धरणात ऑगस्ट महिन्यात पाणी येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. जायकवाडी धरणातील बंद असलेला सहावा पंप लवकरच सुरू केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले. धरणात सध्या ३० टक्क्यांपर्यंत पाणी असून, जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात १६ फूट पाणीपातळी आहे. तलावातून दररोज आठ एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे. हे पाणी सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

जामा मशीद येथे विशेष दुआ
जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यास शेतकरी पेरणीला सुरुवात करू शकतात. यंदा पावसाळा लांबल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी शहरातील ऐतिहासिक जामा मशीद येथे पावसासाठी विशेष दुआ करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Web Title: Even if the rainy season is waited, 'no tension' for Chhatrapati Sambhajinagar;s citizens; 30 percent in Jayakwadi dam, 16 feet water in Hersul Lake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.