शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग
By नंदकिशोर पाटील | Published: April 25, 2024 11:46 AM2024-04-25T11:46:19+5:302024-04-25T11:49:30+5:30
महायुतीकडे ‘मोदी गॅरंटी’ असताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याची गरज का पडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे
छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्यात आले, यावरून बरेच वादंग माजले आहे. महायुतीकडे ‘मोदी गॅरंटी’ असताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याची गरज का पडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे, तर बाळासाहेब ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही. आमच्यासाठी ते आजही वंदनीय आहेत, असे स्पष्टीकरण शिंदेसेनेकडून देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती आणि बुलडाणा अशा आठ मतदारसंघांत ७ मे रोजी मतदान होणार आहे. प्रामुख्याने पश्चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील या आठ जागांवर नजर टाकली, तर भाजप आणि शिवसेनेचे बलाबल समसमान आहे. अमरावती, अकोला, वर्धा आणि नांदेड येथे भाजपचे खासदार आहेत, तर बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली आणि परभणीत शिवसेनेचे. थोडक्यात काय, तर हा सगळा टापू बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदानाचा टक्का खूपच घसरला, शिवाय तिथे महायुतीला फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. म्हणूनच महायुतीने या मतदारसंघातील जाहिरातीत बाळासाहेबांचे छायाचित्र वापरले असावे, असा तर्क काढता येतो. शिवसेना दोन गटांत विभागली गेली असली, तरी स्व.बाळासाहेबांचे स्थान दोन्हीकडे अढळ आहे. म्हणूनच, शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते, एक वेळ पक्ष, चिन्ह नेले हे समजू शकतो, पण त्यांनी तर माझा बापही पळविला!
गुलमंडी ते दिल्ली!
बाळासाहेब ठाकरे यांचे मराठवाड्याशी खूप जुने नाते आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी गुलमंडीत शिवसेनेची शाखा सुरू झाली आणि मुंबई-ठाण्यात ऐकू येणारी ‘जय भवानी-जय शिवाजी’ ही घोषणा औरंगाबादेत घुमू लागली. एरवी मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेने १९८४ च्या भिवंडी दंगलीनंतर हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्याचा फायदा झाला. औरंगाबाद ही तर या भूमिकेसाठी अगदी सुपीक भूमी होती. बाळासाहेबांच्या जहाल हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भारावलेल्या तरुणांची फौज गावोगावी शिवसेनेची शाखा स्थापन करू लागली. १९८८ च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना राजकारणात उतरली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातली पहिली सभा झाली. त्यावेळी प्रथमच शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. ‘खान हवा की बाण’ अशी आक्रमक भूमिका घेत, महापालिका निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेला मिळालेले हे यश होते. मुंबई-ठाण्यानंतर शिवसेनेला मिळालेला हा पहिला मोठा विजय होता. याच पाठबळावर १९८९ साली मोरेश्वर सावे खासदार म्हणून निवडून आले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, ही बाळासाहेबांची मागणीही प्रचंड गाजली.
नामांतर आणि बाळासाहेब
मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. ६ डिसेंबर, १९९४ रोजी नांदेडच्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी, ‘ज्यांच्या घरी नाही पीठ, त्यांना कशाला हवे विद्यापीठ?’ असा बोचरा सवाल केल्याने संघर्षाची ठिणगी पडली. त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. शरद पवारांनी विद्यापीठ नामांतराची घोषणा केली आणि बाळासाहेबांनी आपल्या टीकेची धार आणखीच तीव्र केली. शिवसेनेला याचा राजकीय फायदा झाला. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेनेचे दहा आमदार निवडून आले. नामांतर आंदोलनानंतर मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार झपाट्याने झाला. विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर, ठाकरे यांची भूमिका मवाळ झाली. ते म्हणाले, ‘ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावास माझा विरोध नव्हता, तर मराठवाड्याचा लढाऊ इतिहास पुसला जाऊ नये, एवढेच आमचे म्हणणे होते!’
परभणीची सभा आणि...
२१ फेब्रुवारी, १९९४ रोजी परभणीत झालेली बाळासाहेब ठाकरे यांची सभा खूप गाजली. तत्पूर्वी, औरंगाबाद दंगलीनंतर निषेध सभा घेण्यासाठी निघालेल्या ठाकरे यांना पोलिसांनी पुण्याजवळ अडविले होते. बाळासाहेबांनी तो प्रसंग परभणीच्या सभेत सांगितला. ते म्हणाले, मला अटक झाली असती, तर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले असते, म्हणून मी माघारी फिरलो. बाळासाहेबांच्या त्या सभेने परभणी, हिंगोली आणि शेजारच्या नांदेड जिल्ह्याचा राजकीय पट बदलला. १९९८ चा अपवाद वगळता गेल्या ३३ वर्षांपासून परभणीत शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे, तर १९९१ साली विलासराव गुंडेवार यांनी हिंगोलीत शिवसेनेचे खाते उघडले आणि त्यानंतर हिंगोलीत पाच वेळा शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.
चौकार मारणार का?
उद्धवसेना मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि औरंगाबाद अशा चार जागा लढवित आहे. संजय उर्फ बंडू जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद) हे दोन खासदार उद्धवसेनेत, तर हेमंत पाटील (हिंगोली) हे शिंदेसेनेत आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबादेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा मैदानात उतरविण्यात आले आहे. उद्धवसेनेचे चारही उमेदवार तुल्यबळ आहेत. महायुतीच्या उमेदवारांची कसोटी लागणार आहे. उद्धव ठाकरे यावेळीही चौकार मारणार का, याबाबत औत्सुक्य आहे.