अंगावरून रेल्वे धावली तरी वृद्धाला खरचटलेही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 05:47 PM2019-09-05T17:47:46+5:302019-09-05T18:04:54+5:30
वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद : आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वेरुळावर झोपलेल्या वृद्धाच्या अंगावरून रेल्वे धावली, मात्र त्यांचे दैव बलवत्तर असल्याने त्यांना साधे खरचटलेदेखील नाही. रेल्वे मोटारमनच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी धावती गाडी थांबवून घटनेची माहिती पोलिसांना दिली. हा प्रकार बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील रेल्वेरुळावर घडला.
धोंडोपंत रामराव वडीकर (७२, रा. स्वप्नगरी, गारखेडा परिसर) असे त्यांचे नाव आहे. पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले की, धोंडोपंत हे जालना येथील सेवानिवृत्त अभियंता आहेत. स्वप्ननगरी येथील मुलाकडे ते राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हापासून बऱ्याचदा त्यांना आठवत नाही. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले आणि थेट मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळील रुळावर जाऊन झोपले. त्यावेळी जालन्याकडून आलेली एक गाडी तेथे थांबलेली होती. नंतर ही गाडी पुढील प्रवासाला निघाली. गाडीचा वेग कमी असल्याने रेल्वेरुळावर एक व्यक्ती झोपलेला असल्याचे रेल्वे मोटारमन यांना दिसले. त्यांनी लगेच गाडीला ब्रेक लावला. मात्र तोपर्यंत रेल्वेचे काही डब्बे धोंडोपंत यांच्या अंगावरून गेले होते.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेरुळावर झोपलेल्या धोंडोपंत यांना प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी रेल्वेखालून बाहेर काढले. तेव्हा त्यांना साधे खरचटलेदेखील नसल्याचे दिसून आले. यानंतर त्यांना पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आत्महत्या करण्यासाठी रुळावर का झोपला आणि तुम्ही कोण आहात हे त्यांना सांगता येत नव्हते. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस कर्मचारी विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी त्यांचे समुपदेशन करून त्यांना बोलते केले. तेव्हा त्यांनी त्यांचे नाव आणि पत्ता सांगितला. यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुलाला बोलावून घेतले. किरकोळ कारणावरून नातेवाईकांसोबत झालेल्या कुरबुरीनंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले.
मुलाला बसला धक्का!
७२ वर्षीय धोंडोपंत हे आत्महत्येसाठी रेल्वेरुळावर झोपल्याचे कळताच त्यांच्या मुलाला धक्काच बसला. त्यांनी वडिलांची काळजी घेण्याचे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची लेखी हमी पोलिसांना देऊन त्यांना घरी नेले.