हृदयरोग, मधुमेह असला तरी कोरोना लस घ्यायलाच हवी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:52 PM2021-03-10T13:52:57+5:302021-03-10T13:54:26+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील, पण व्याधी असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे.
औरंगाबाद : मला हृदयरोग आहे, मला मधुमेह, अलर्जी आहे, मग कोरोना लस कशी घेता येणार, असा गैरसमज करून अनेक नागरिक लसीकरणापासून दूर राहत आहेत; परंतु हे आजार असणाऱ्यांनाही कोरोना प्रतिबंधात्मक लसीची ढाल घेता येते. त्यामुळे विविध व्याधी असणाऱ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लस घेतली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील, पण व्याधी असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे. आजार असल्याने लस घेता येत नसल्याचा गैरसमज, तसेच भीतीपोटी अनेक जण लसीकरणापासून चार हात दूर राहत आहेत; परंतु एखादी व्याधी असेल तरीही लस घेता येते. त्यामुळेच विविध आजार असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. आजारांची लसीकरण केंद्रावर योग्य ती माहिती देऊन तज्ज्ञांच्या निगराणीत लस घेता येते. त्यामुळे विविध आजार असणाऱ्यांनीही लसीकरणात एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
थंडी, ताप आला तरी घाबरू नये...
लसीकरणानंतर ताप येणे, घसा खवखवणे, वाहणारे नाक, खोकला आणि सर्दीचा त्रास काही जणांना पाहायला मिळतो; परंतु लसीकरणानंतर या गोष्टी होणे सामान्य आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाता कामा नये. लसीकरणानंतर लाभार्थींला गोळ्या दिल्या जातात, त्या गोळ्या वेळच्या वेळी घ्याव्यात, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.
४४,१७५ -जणांना आतापर्यंत दिली लस
९,९५४-इतक्या ज्येष्ठ नागरिकांना दिली लस
काय म्हणतात तज्ज्ञ...
अँजिओप्लास्टी, बायपास झालेल्या रुग्णांना लस घेण्यात कोणतीही अडचण नाही. रक्त पातळ होण्याची औषधी घेणाऱ्यांनाही लस घेता येते. व्हाॅल्व्हची शस्त्रक्रिया झालेल्या, रक्त तीनपटीपेक्षा जास्त पातळ असेल तर त्यांना लसीकरणापूर्वी हे प्रमाण २ ते ३ मध्ये आणावे लागते. छोट्या साईजची निडल वापरूनही लस घेता येते.
- डॉ. विलास मगरकर, हृदयरोगतज्ज्ञ
मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना अगदी सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे लस घेता येते. डायलिसिस, तपासण्यांच्या निमित्ताने हे रुग्ण रुग्णालयात वारंवार जात असतात. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्राधान्याने या रुग्णांनी लस घेतली पाहिजे.
-डॉ. आदित्य येळीकर, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ
हृदयरोग, पॅरेलिसिस, रक्तदाब, कर्करोग आणि मधुमेह असणाऱ्या या सगळ्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेता येते. एखादी अलर्जी असेल तरीही लस घेता येते. त्यामुळे या आजारांच्या रुग्णांनी कोणतीही भीती न बाळगता लस घेण्यास प्राधान्यक्रम दिला पाहिजे.
- डॉ. तुषार चुडीवाल, मधुमेहतज्ज्ञ
हृदयरोग, रक्तदाब आहे म्हणून लस घेण्याचे टाळू नये. या रुग्णांनाही लस घेता येते. रक्त पातळ होण्याची औषधी घेत असलेल्या रुग्णांनाही लस घेण्यात कोणतीही अडचण नाही. थंडी, ताप, सर्दी असेल तरीही घाबरून जाता कामा नये.
- डॉ. मानव पगारे, फिजिशियन