तुमच्या अंगणातले झाड तोडायचे तरी घ्यावी लागते परवानगी, अन्यथा होईल फौजदारी कारवाई
By मुजीब देवणीकर | Published: December 15, 2023 06:42 PM2023-12-15T18:42:25+5:302023-12-15T18:42:46+5:30
वृक्ष प्राधिकरणाची परवानगी नसेल तर होऊ शकते फौजदारी कारवाई
छत्रपती संभाजीनगर : आपल्या अंगणात एखादे मोठे झाड असेल आणि तोडण्याची वेळ आली तर परस्पर तोडता येत नाही. त्यासाठी महापालिकेने नेमलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घ्यावी लागते. परवानगी न घेता झाड तोडल्यास दंडात्मक अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई हाेऊ शकते. समिती झाड तोडण्याचे कारण, गरज लक्षात घेऊन परवानगी देते.
शहरात अगोदरचे वृक्षांची संख्या झपाट्याने कमी हाेऊ लागली. जिकडे तिकडे सिमेंटचे जंगल उभे राहू लागले. भविष्यात नागरिकांना शुद्ध हवा कशी मिळेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दरवर्षी पावसाळ्यात विविध संस्था, संघटना वृक्षारोपण मोहीम राबवितात. मात्र, नंतर ती झाडे जगतात का? याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. प्रत्येक घरासमोर एक झाड लावण्याची आज नितांत गरज असताना नागरिकांना विविध कारणांमुळे झाडे तोडावीसुद्धा लागतात. कोणीही परस्पर झाडे तोडू नयेत म्हणून शासनाने कायदा केला. त्याची अंमलबजावणी शहरी भागात महापालिकेला करावी लागते.
कुठलेही झाड-फांद्या तोडायच्या असल्यास लागते परवानगी
शहरात कुठेही झाड, फांद्या कापायच्या असतील तर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक असते.
अर्ज कसा करायचा?
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या कार्यालयात साध्या कागदावरही अर्ज करता येऊ शकतो. त्यासाठी संपूर्ण विवरण म्हणजे झाड कोणते? कशासाठी तोडणे आवश्यक याबाबींचा उल्लेख अर्जदाराला करावा लागतो.
कोणत्या कारणासाठी झाड तोडता येते
झाड जुने असेल, इमारतीवर त्याच्या फांद्या किंवा झाड कोसळल्यास जीवतहानी होऊ शकते. घराचे बांधकाम करायचे असेल झाड अडसर ठरत असेल तर परवानगी मिळू शकते. त्यापूर्वी मनपा अधिकारी, कर्मचारी झाडाची पाहणी करतात.
कोठे मिळते परवानगी? महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात उद्यान अधीक्षक यांच्या कार्यालयात झाडे, फांद्या कापण्यासाठी अगोदर अर्ज करावा लागतो. अधून मधून समितीची बैठकीत सर्व अर्जांवर एकत्रित निर्णय होतो. तर गुन्हा दाखल होईल.
एखाद्या नागरिकाने परवानगी न घेता झाड तोडल्यास त्याच्या गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. अनेकदा आसपासचे नागरिक मनपाकडे तक्रार करतात. तक्रारीची शहानिशा करून नंतर कारवाई केली जाते.
११ महिन्यांत ९२ झाडे तोडण्याची परवानगी
जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे किमान ३८२ पेक्षा अधिक झाडे तोडण्यासाठी अनेक नागरिकांनी परवानगी मागितली. त्यातील ९२ झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली.
प्रत्येक अर्जाची शहानिशा
शुल्लक कारणांसाठी अनेकजण झाड तोडण्याची परवानगी मागतात. अर्जाचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती निर्णय घेते. प्रत्येक अर्जाची जागेवर जाऊन शहानिशा केली जाते.
- विजय पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक