लेण्यांमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया...’; छत्रपती संभाजीनगरात अनेक रूपांतील गणरायांचे दर्शन
By संतोष हिरेमठ | Published: September 27, 2023 05:22 PM2023-09-27T17:22:28+5:302023-09-27T17:23:14+5:30
काही लेणींच्या सुरुवातीलाच ‘श्रीं’चे दर्शन घडते, तसेच काही ठिकाणी, तसेच गर्भगृहाच्या बाहेर सुरुवातीलाच गणेशाची शिल्पे आहेत.
छत्रपती संभाजीनगर :गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र लाडक्या बाप्पांचे घरोघरी आगमन झालेले आहे. जगप्रसिद्ध वेरुळ लेणी आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील बुद्ध लेणीतही गणरायांचे दर्शन घडते. या ठिकाणी अनेक रूपांतील ‘बाप्पा..’ विराजमान आहेत.
वेरुळ लेणीतील हिंदू लेणी समूहात विविध गणेशांची शिल्प शिल्पांकित केलेली आहेत. गणेशास विघ्नहर्ता म्हटले जाते. प्रथम पूजेचा मानही गणरायाला दिला जातो. त्यामुळे काही लेणींच्या सुरुवातीलाच ‘श्रीं’चे दर्शन घडते, तसेच काही ठिकाणी, तसेच गर्भगृहाच्या बाहेर सुरुवातीलाच गणेशाची शिल्पे आहेत.
लेणीत या ठिकाणी गणराय वेरुळ लेणीत लेणी क्रमांक १४, १६ (कैलास), १६ ए, २१ (रामेश्वर लेणे) आणि २२ मध्ये सप्तमातृका शिल्पपटात गणपतीच्या मूर्ती आहेत. लेणी क्रमांक १६, २१ येथे प्रवेशद्वाराजवळ गणेशमूर्ती आढळते. लेणी क्रमांक १५ (दशावतार लेणे) येथे मुख्य गर्भगृहाच्या बाहेर, कैलास लेणीमधील लंकेश्वर लेणी भागात गणेशाचे शिल्प आहे. कैलास लेणीत प्रदक्षिणा पथावरही गणराय विराजमान आहेत. १६ ए या लेणीत गणपती सप्तमातृकांसह उभे आहेत. लेणी क्रमांक २१ च्या बाजूने एक रस्ता वरच्या बाजूला जातो. तेथे पूर्ण शिल्पकाम न झालेला एक लेणी समूह आहे. यातील एका लेणीत ‘श्री’ विराजमान आहेत, यास ‘गणेश लेणी’ असे म्हणतात. शहरातील बुद्ध लेणीतही गणपतीचे शिल्प आहे.
सामाजिक सौहार्द
मूर्ती व शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉ.संजय पाईकराव म्हणाले, शहरातील बुद्ध लेणी क्रमांक-६ मध्ये गणपतीचे शिल्प आहे. तत्कालीन कालखंडात कलाकार हे सर्वधर्मांचे असल्यामुळे सामाजिक सौहार्द साधण्यासाठी हे शिल्प कोरलेले आहे.
अनामिक कलाकारांचे शिल्पकामातील कसब
इतिहास अभ्यासक योगेश जोशी म्हणाले, वेरुळ येथील लेण्यांमध्ये सुंदर आणि तितकीच मोठी गणेश शिल्पे पाहावयास मिळतात. शक्ती नियंत्रक, वरद विनायक, विघ्नहर्ता अशा विविध रूपांत शिल्पांकित गणेशमूर्ती आहेत. गणेश शिल्प बघताना, त्या अनामिक कलाकारांचे शिल्पकामातील कसब लक्षात येते.