बाजारात येण्याआधीच १ कोटी १५ लाखांचा कालबाह्य किटकनाशक व खताचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:41 AM2018-04-29T00:41:56+5:302018-04-30T11:48:07+5:30
कृषी अधिकाऱ्यांची कारवाई : शरणापूर -माळीवाडा शिवारातील गोदामावर छापा
दौलताबाद ( औरंगाबाद ) : कालबाह्य झालेले कीटकनाशक व खते अनाधिकृतपणे साठवून त्याची नवीन पॅकींग सुरु असतानाच कृषी अधिकाºयांनी गोदामावर छापा मारला व बाजारात जाण्याआधीच जवळपास एक कोटी पंधरा लाखाचा साठा जप्त केला.
ही कारवाई औरंगाबाद -नाशिक महामार्गावरील शरणापूर -माळीवाडा रस्त्याच्या १०० फुटावर गट नं. ७८ मधील गोदामात करण्यात आली. गणेश गवते यांनी हे गोदाम भाडे तत्वावर दिलेले असून या गोदामावर सेजल ग्लास पावडर बनवणा-या कंपनीचा बोर्ड लावलेला आहे. ही कंपनी मागच्या बाजूला चालू असून गोदामाच्या अर्ध्या भागामध्ये प्लायबोर्ड लावून कीटकनाशक व खताचा साठा होता. याकडे कुणाचेही लक्ष जात नव्हते. येथे कालबाह्य झालेला किटकनाशक व खताचा साठा पिशव्यांमध्ये भरुन जणू नवीन साठा आहे, अशी पॅकींग करण्याचे काम सुरु होते. याची गुप्त माहिती कृषी अधिका-यांना मिळाली.
शुक्रवारी रात्री दहा वाजेपासून या भागात अधिका-यांनी सापळा लावला व खात्री पटल्यानंतर लगेच छापा मारला. यावेळी मोठ्या प्रमाणात नकली बी-बियाणे आढळून आले, परंतु तेथे कुणीही इसम हजर नव्हता. या घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांना देण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोजमाप घेण्यात आले. रात्र जास्त कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे मोजमाप करणे शक्य नव्हते. यानंतर रात्री तीन वाजता कंपनीला टाळे ठोकण्यात आले. शनिवारी दुपारी पुन्हा कृषी अधिकारी व कर्मचा-यांनी मोजमाप करण्यास सुरुवात केली. यात सील करण्यासाठी लागणारी मशीन व मोजमाप करण्यासाठी लागणारा इले. वजनकाटा, अनेक कंपनीचे लेबल असलेल्या पॅकींगच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. सापडलेला मुद्देमाल प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. सुदैवाने हा साठा बाजारात आला नाही. नाही तर अनेक शेतक-यांची फसवणूक झाली असती.
प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर कारवाई
प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले. गोदामावर छापा मारला तेव्हा तेथे कुणीही नव्हते. रात्री उशिरापर्यंत दौलताबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कृषी अधिकारी यातील आरोपींचा शोध घेत असल्याने त्यांची नावे कळू शकले नाहीत. ही कारवाई कृषी अधिकारी आनंद गंजेवार, जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी आशिष काळुसे, पंचायत समिती कृषी अधिकारी दिनकर जाधव, रोहिदास राठोड, तालुका कृषी अधिकारी राम बेंबरे, सुदर्शन मातीमवार, शकील पटेल, चितळेकर यांनी यशस्वी केली.