बाजारात येण्याआधीच नवीन सोयाबीन ४ हजारांनी गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:03 AM2021-09-26T04:03:56+5:302021-09-26T04:03:56+5:30

औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी सोयाबीन पीक शेतात डोलत असताना बाजारात प्रतिक्विंटल भाव ९५०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. मात्र, ...

Even before the new soybeans hit the market, 4,000 fell | बाजारात येण्याआधीच नवीन सोयाबीन ४ हजारांनी गडगडले

बाजारात येण्याआधीच नवीन सोयाबीन ४ हजारांनी गडगडले

googlenewsNext

औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी सोयाबीन पीक शेतात डोलत असताना बाजारात प्रतिक्विंटल भाव ९५०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. मात्र, आता काढणी होऊन सोयाबीन बाजारात येण्याची वेळ झाली आणि तब्बल ४ हजार रुपयांनी भाव गडगडला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तसे पाहता औरंगाबाद जिल्ह्यात खरिपात मक्याची पेरणी सर्वाधिक होत असते; पण मागील वर्षभरात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पेरणीकडे वळले. परिणामी, जिथे सरासरी १४ हजार ६१४ हेक्टर पेरणी होत असते. तिथे यंदाच्या खरीप हंगामात २८ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी जाऊन पोहोचली. यंदा उत्पादनही वाढल्याने ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळून व दसरा-दिवाळी जोमात जाईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, अंतिम टप्प्यातील पावसाने हंगाम १५ दिवस लांबला आणि याचदरम्यान सोयाबीनचे भाव कोसळले शनिवारी जाधववाडीत ४१०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल सोयाबीन विकले जात होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

चौकट

सोयाबीनचा दर (प्रतिक्विंटल)

महिना वर्ष किंमत

जानेवारी २०२० ३९०० रु.

जून २०२० ३४०० रु.

ऑक्टोबर २०२० ३१५० रु.

जानेवारी २०२१ ४००० रु.

ऑगस्ट २०२१ ९५०० रु.

सप्टेंबर २०२१ ४१००-५२०० रु.

-------

चौकट

खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू

सोयाबीनचा भाव ९ हजारांवर जाऊन पोहोचल्याने पहिल्यांदा मी एक एकरवर सोयाबीन लावले. मात्र, परतीच्या पावसाने शेंगा काळ्या, तर पाने पिवळी पडू लागली आहेत. याच वेळी भाव ४ हजारांपर्यंत खाली घसरला आहे. नवीन प्रयोग करायला गेलो; पण आमच्याच अंगलट आले.

-नेहरू काबरे, शेतकरी, श्यामवाडी, पळशी

----

खाद्यतेल आयात शुल्क घटविल्याचा फटका

ऐन सोयाबीन बाजारात येण्याच्या वेळीच केंद्र सरकारने सोयाबीन तेलाचे आयात शुल्क २५ टक्क्यांनी कमी केले. याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादन अधिक, त्यात आयात शुल्क घटल्याने आयात वाढणार व सोयाबीनचे भाव आणखी कमी होणार.

-नामदेव सूर्यवंशी, जटवाडा

---

व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया

शेतकऱ्यांनी विकण्याची घाई करू नये

सोयाबीनचा भाव क्विंटलमागे ४ हजार रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये. सोयाबीनला वाळवा व सुकलेले सोयाबीन बाजारात आणा, त्यास चांगला भाव मिळेल.

-हरीश पवार, अडत व्यापारी

---

ओलसर मालामुळे भाव कमी

अडत बाजारात शेतकरी सोयाबीन आणत आहेत. त्यात ३० ते ३५ टक्के ओलसर माल आहे. म्हणजे क्विंटलमागे २० किलोची घट होते. यामुळे भाव कमी मिळत आहे. सुकलेले सोयाबीन आज ६ हजार ते ६२०० रुपये क्विंटलने विकले जाते.

-दत्तात्रय आष्टीकर, अडत व्यापारी

Web Title: Even before the new soybeans hit the market, 4,000 fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.