आजही माझे वलय, मी ज्येष्ठ नेता; चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:24 IST2024-12-06T19:22:59+5:302024-12-06T19:24:06+5:30
उद्धव सेनेत माजी खा. चंद्रकांत खैरे व आ. अंबादास दानवे या दोन नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण सतत पाहायला मिळते.

आजही माझे वलय, मी ज्येष्ठ नेता; चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना डिवचले
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव सेनेला पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतरही नेत्यांमधील गटबाजी कायम असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा दिसून आले. शहरातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांच्या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘आजही माझे वलय आहे, मीच मोठा नेता, असे’ वक्तव्य करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांना डिवचले.
उद्धव सेनेत माजी खा. चंद्रकांत खैरे व आ. अंबादास दानवे या दोन नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण सतत पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांनी उमेदवारीवर दावा केला. त्यातून त्यांच्यातील वाद थेट ‘मातोश्री’पर्यंत गेला. ‘मातोश्री’वरून समज दिल्यानंतरही वाद शमला नाही. खैरे यांनी पराभवानंतर दानवे यांनी निवडणुकीत काम केले नाही, असा आरोप केला होता. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील उद्धव सेनेच्या सहाही उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. या अपयशानंतर महापालिका निवडणुकीची तयारी केली जात आहे. आ. दानवे यांनी विविध मतदारसंघांत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
खैरे यांनी बुधवारी औरंगपुरा येथील शिवसेना भवनात प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यात काही पदाधिकाऱ्यांनी खैरे-दानवे वाद मिटला पाहिजे, त्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, अशी भावना व्यक्त केली. त्यावर खैरे यांनी ‘मी मोठा नेता आहे, माझे जनतेत वलय आहे. त्याच्यासोबत मी जुळवून घ्यावे काय’, असा सवाल केला. क्रांती चौक येथे बांगला देश हिंदूंवरील अत्याचारविरोधी आंदोलन दानवे यांच्या नेतृत्वात असेल असे जाहीर करण्यात आले होते. ‘मी त्याच्या नेतृत्वाखाली काम करू का’, असा प्रश्न खैरे यांनी केला. ‘त्यांनी दोन पावले मागे घेतले तर मी चार घेईन’, असे खैरे म्हणाले. या बैठकीला अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, महानगरप्रमुख राजू वैद्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघप्रमुख राजू शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
‘एकला चलो’ची मागणी
अनेक पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेल्याने पक्षाला अपयश आले. पुन्हा हिंदुत्वाची भूमिका घेत पक्षाने स्वतंत्र वाटचाल करावी, अशी मागणी केली. त्यावर खैरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तुमच्या भावना त्यांच्या कानावर टाकतो, असे आश्वासन दिले.