रंगपंचमीआधीच निसर्गाने केली मुक्त रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:05 AM2021-02-18T04:05:41+5:302021-02-18T04:05:41+5:30

सिल्लोड : वसंतपंचमीपासून वसंत ऋतुस सुरुवात झाली आहे. यात अवघ्या काही दिवसांवर आलेल्या रंगपंचमीची माणसांची अजून तयारीच सुरु ...

Even before Rangpanchami, nature has made a splash of free colors | रंगपंचमीआधीच निसर्गाने केली मुक्त रंगांची उधळण

रंगपंचमीआधीच निसर्गाने केली मुक्त रंगांची उधळण

googlenewsNext

सिल्लोड : वसंतपंचमीपासून वसंत ऋतुस सुरुवात झाली आहे. यात अवघ्या काही दिवसांवर आलेल्या रंगपंचमीची माणसांची अजून तयारीच सुरु असताना निसर्ग मात्र, मुक्त रंगांची उधळण करीत आहे. अजिंठ्यासह इतर पर्वतरांगांमध्ये पळस फुलला असून काटेसावरही बहरली असून कांचनची गुलाबी फुले शृंगारात भर घालत असून निसर्गाचा हा रंगोत्सव मनाला मोहनी घालत आहे.

सध्या प्रत्येक गावशिवारात, डोंगरात काटे सावर, पळस, कांचन हे स्वदेशी वृक्ष फुलबहारात असून हे पुष्पवैभव पाहून मन अगदी हरखून जात आहे. काटे सावर अर्थात शाल्मलीच्या लाल जर्द फुलांमधील विपुल मात्रेत असलेला "मकरंद"चाखायला शिंजिर, जांभळा शिंजिर, रान चिमणी, सातभाई, कवड्या सुतार, हळद्या, सूर्यपक्षी, मैना, शृंगराज, कोतवाल आदी ३० हून अधिक पक्षी व दिमतीला मधमाशा, फुलपाखरे, कीटक हे ही हा पुष्परस प्राशन करण्यास दिवसभर जमलेले असतात. हीच मांदियाळी पळसाच्या फुलांवर दिसत असून निसर्गाने जणूकाही उन्हाळ्याच्या सुरुवातीला पक्षी, कीटकांसाठी ज्युसची व्यवस्था केली आहे. काटे सावर महाऔषधी वृक्ष आहे. त्याच्या खोडापासून निघणारा मोचरस अतीसार, पोटात मुरडा येणे यावर गुणकारी आहे. कांचन वृक्षाची फुले रानभाजी आहेत, ती बद्धकोष्ठता दूर करते. लाल जर्द भगव्या फुलांनी लगडलेला पळस लांबून पाहिला की रानात वणवा पेटला आहे, असा भास होतो म्हणून यास 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' म्हणतात.

चौकट......

अजिंठा लेण्यांमधील चित्रांमध्ये वापरले रंग

काटेसावर,पळस यांच्या फुलांपासून नैसर्गिक रंग बनवितात. आजही सातपुड्यातील पावरा या आदिवासी जमातीतील लोक याच नैसर्गिक रंगांत रंगोत्सव साजरा करतात. पंधराशे वर्षापूर्वी कातळावर चितारलेल्या अजिंठा लेण्यांमधील चित्रांमध्ये हेच रंग वापरले आहेत. आज २१ व्या शतकातही हे रंगतेज कायम आहे.

कोट

निसर्ग रंग वापरावे

पळस पापडी त्वचेच्या बुरशीजन्य आजारावर उपयोगी आहे. कापशी, सापमार गरुड, तीस आदी पक्षी या झाडावर घरटी करण्यास अधिक प्राधान्य देतात. माकडं पळस फुलांचे महाशौकीन आहेत. पळसाच्या फुलांत 'डास'अंडी घालतात, मात्र ती अंडी उबवत नाही,परिणामी डासांची संख्या नियंत्रणात राहते. पळसाच्या पत्रावळ्या वापरून प्लॅस्टिकला तिलांजली देणे शक्य आहे. होळीत रासायनिक हानिकारक रंग न वापरता निसर्गा समवेत निसर्ग रंग वापरणे योग्य आहे.

-डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड.

फोटो कॅप्शन : काटे सावर, कांचन फुल फोटो

Web Title: Even before Rangpanchami, nature has made a splash of free colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.