२ महिन्यांसाठी दिलेलं निवडणूक कामही जमले नाही, पोलिस कर्मचारी तत्काळ निलंबित
By सुमित डोळे | Published: April 25, 2024 07:31 PM2024-04-25T19:31:17+5:302024-04-25T19:31:53+5:30
वरिष्ठांना काहीही न कळवता पोलिस कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित
छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करूनही कामावर हजर न झाल्याबद्दल जिल्हा पोलिस दलातील पाेलिस नाईक साहेबराव बाबुराव इखारेला निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी मंगळवारी रात्री उशिरा याबाबत तडकाफडकी आदेश जारी करत अन्य कर्मचारी, अधिकाऱ्यांनादेखील निवडणुकीच्या कामात कसूर केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
पोलिस अधीक्षक कलवानीया यांनी नुकताच जिल्ह्यातील सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेत ठाणे प्रभारींना आवश्यक सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने निवडणूक कामासाठी नियुक्ती कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वर्तन पारदर्शक राहुन कामात सजगता राहावी, अशा सक्त सूचनाच त्यांनी केल्या. शिवाय, प्रशासकीय पातळीवरदेखील आवश्यक बंदोबस्ताची मागणी केली असून लवकरच बंदोबस्तासाठी सुरक्षा यंत्रणांचे पुरेसे मनुष्यबळ मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हयगय चालणार नाही
जिल्हा पोलिस दलाच्या दंगा काबू पथकातील पोलिस नाईक साहेबराव इखारेला वैजापूर येथील निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठांना काहीही न कळवता तो कर्तव्यावर अनुपस्थित राहिला. ही बाब निदर्शनास येताच कलवानीया यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. इखारेला सप्टेंबर, २०२३ मध्येदेखील निलंबित केले असून गंभीर गुन्हेदेखील दाखल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.