यंदाच्या उन्हाळ्यातही घशाला कोरडच; शहराच्या पाण्यात वाढ करण्याचा प्रयोग पुन्हा लांबला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 03:47 PM2022-03-16T15:47:22+5:302022-03-16T15:47:47+5:30

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते.

Even this summer, aurangabadkars throat is dry; The experiment of raising the city's water level was again delayed | यंदाच्या उन्हाळ्यातही घशाला कोरडच; शहराच्या पाण्यात वाढ करण्याचा प्रयोग पुन्हा लांबला

यंदाच्या उन्हाळ्यातही घशाला कोरडच; शहराच्या पाण्यात वाढ करण्याचा प्रयोग पुन्हा लांबला

googlenewsNext

औरंगाबाद : जायकवाडीहून शहरासाठी वाढीव पाणी आणावे अशी मागणी मागील दोन दशकांपासून औरंगाबादकर करीत आहेत. शहरात वाढीव पाणी आणणार अशी गेले वर्षभर घोषणा करणारी महापालिका व शासनाने आता वाढीव पाणी आणण्याचा प्रयोग तहकूब केल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही शहराच्या घशाला कोरड पडणार, हे स्पष्ट झाले. पावसाळ्यानंतरच नवीन सात किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होऊ शकते.

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते. जास्तीचे पाणी आणण्याची क्षमता महापालिकेच्या दोन्ही जलवाहिन्यांमध्ये नाही. जलवाहिन्यांसह उपसा करणाऱ्या मोटारींचे आयुष्य २० वर्षांपूर्वीच संपले आहे. फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत अनेक ठिकाणी जलवाहिनीची जाडी कमी झाली. पाण्याचा वेग व दाब जराही वाढला तरी जलवाहिनी फुटते. शहरातील पाणीप्रश्नी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी २० एमएलडी पाणी वाढवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. वर्ष संपत आले तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात औरंगाबादकरांच्या नशिबी पाणी... पाणी... करण्याची वेळ येणार, हे निश्चित.

२०० वसाहती टँकरवर
शहरातील २०० पेक्षा अधिक वसाहतींना मागील १० वर्षांपासून टँकरद्वारे तहान भागवावी लागते. या वसाहतींमध्ये जलवाहिन्याच टाकण्यात आलेल्या नाहीत. ३०० रुपये दरमहा देऊन आठवड्यातून दोनदा एक ड्रम पाणी मिळते. वापरण्यासाठी नागरिकांना वेगळे पैसे खर्च करून पाणी घ्यावे लागते. शहराचे पाणी वाढविण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाने कधीच लक्ष दिले नाही, हे विशेष.

पाच दिवस, आठ दिवसांआड पाणी
शहरातील वेगवेगळ्या भागांत महापालिकेकडून सोयीनुसार पाणीपुरवठा करण्यात येतो. सर्व वसाहतींना दिवसाआड पाणी द्या, एवढी साधी मागणीही मान्य होत नाही. काही भागांत पाच दिवसाआड, तर काही भागांत आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

७ कि.मी. जलवाहिनी आवश्यक
नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिनीतूनच २० एमएलडी पाणी अधिक खेचावे लागणार आहे. सध्याच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्यामुळे जलवाहिनी अनेकदा फुटते. त्यामुळे क्रॉस कनेक्शन करावे लागणार आहे. त्यासाठी सात किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकावी लागणार आहे. पाईपनिर्मितीचे काम वेगात आल्यावरच हे काम शक्य आहे.
- अजय सिंह, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

Web Title: Even this summer, aurangabadkars throat is dry; The experiment of raising the city's water level was again delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.