कपाटाचे दरवाजा आणि कुलूप दोन्ही शाबित तरीही ३ लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 07:50 PM2021-03-10T19:50:40+5:302021-03-10T19:51:18+5:30
Crime News या चोरीप्रकरणी तक्रारदार कुटुंबाने त्यांच्या घरात काम करणाऱ्या नोकर दोन महिलांवर संशय व्यक्त केला आहे
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन परिसरातील हाॅटेल व्यावसायिकाच्या घरातून सुमारे तीन लाखांच्या सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना ३ मार्च रोजी सायंकाळी समोर आली. या चोरीप्रकरणी तक्रारदार कुटुंबाने त्यांच्या घरात काम करणाऱ्या नोकर दोन महिलांवर संशय व्यक्त केला आहे, वेदांतननगर पोलिसांनी या प्रकरणी संशयित महिलांवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तक्रारदार आकाश महेश कमलानी हे पदमपानी कॉलनीत आई-वडील आणि बहीण यांच्यासह राहतात. रेल्वे स्टेशन परिसरात त्यांचे हॉटेल आहे, त्यांच्या घरी दोन महिला धुणीभांडी आणि साफसफाईचे काम करतात. तक्रारदार यांचे जवळचे नातेवाइकाचे निधन झाल्यामुळे त्यांचे आई-वडील १७ फेब्रुवारी रोजी पुण्याला गेले होते. तेव्हा घरी असलेली त्यांची बहीण ही कांचनवाडी येथील महाविद्यालयात गेली, तक्रारदार हे त्यांच्या कामात व्यग्र होते. २२ फेब्रुवारी रोजी वडील तर ३ मार्च रोजी तक्रारदाराची आई गावाहून औरंगाबादला परतल्या.
घरी आल्यावर त्यांनी कपाटात उघडले असता, त्यात ठेवलेले ८८ हजार ८५० रुपये किमतीचे सोन्याचे कडे, २६ हजार ६७० रुपयांची हिऱ्याची अंगठी, २३ हजार ६४५ रुपयांची कानातील जोड, १२ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि ९६ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याच्या बांगड्या हे सर्व दागिने चोरीला गेल्याचे दिसले. यानंतर, त्यांनी घरातील प्रत्येकांकडे दागिन्यांविषयी विचारपूस केली, परंतु कपाट उघडले नसल्याचे सांगितले. घरकाम करणाऱ्या नंदा मिसाळ आणि संगीता अहिरे यांच्याकडे विचारपूस केली, परंतु त्यांनीही या दागिन्यांची माहिती नसल्याचे सांगितले, या दोन्ही महिलांशिवाय घरात बाहेरील व्यक्ती आली नसल्यामुळे कमलनी कुटुंबाने दोन्ही महिलांविरुद्ध संशय व्यक्त करीत वेदांतनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.