चांगली पगार तरी लाच घेताना सापडले, आता साहेबांच्या कृपेने निलंबन लटकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:53 IST2025-04-19T13:53:25+5:302025-04-19T13:53:35+5:30

शासकीय सेवेत कोणाला गलेलठ्ठ, तर अनेकांना समाधानकारक पगार असतानाही केवळ पैशांच्या हव्यासापोटी लाचेच्या मोहात अडकतात.

Even though paid a good salary, was caught taking bribes, and now suspension delayed by the grace of my boss? | चांगली पगार तरी लाच घेताना सापडले, आता साहेबांच्या कृपेने निलंबन लटकले?

चांगली पगार तरी लाच घेताना सापडले, आता साहेबांच्या कृपेने निलंबन लटकले?

छत्रपती संभाजीनगर : लाचखोर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून तत्काळ निलंबत करणे अपेक्षित असते. मात्र, अनेक शासकीय विभागांकडून यात टाळाटाळा केली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये लाचेच्या सापळ्यात सापडलेल्या एकूण १८१ अंमलदारांना अद्यापही निलंबित करण्यात आलेले नसून, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील २५ अंमलदारांचा समावेश आहे.

शासकीय सेवेत कोणाला गलेलठ्ठ, तर अनेकांना समाधानकारक पगार असतानाही केवळ पैशांच्या हव्यासापोटी लाचेच्या मोहात अडकतात. शासन दरबारी शिस्तीचे नियम असले, तरी अशा लाचखोरी करणाऱ्यांचे धाडस कमी झाले नाही. शिवाय, लाच घेताना पकडले जात असले, तरी त्यांच्या निलंबनात दिरंगाई होत असल्याने लाचखोरांचा विश्वास मात्र वाढत आहे. काहींवर चौकशी सुरू असली, तरी वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणांमुळे लाचखोर पुन्हा सेवेत राहतात. त्यामुळे प्रशासनाच्या कामाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह आहे.

२०२४ मध्ये १७८ लाचखोर
२०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात १११ लाचेच्या कारवायात १७८ लाचखोर पकडले गेले. या कारवाया होताच विभागाकडून संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विभागप्रमुखांना पत्राद्वारे कारवाईची माहिती दिली जाते. मात्र, तरीही निलंबन टाळले जाते.

२०२५ मध्ये ३६ कारवायांमध्ये ४४ लाचखोर अडकले.
शहर - लाचेच्या कारवाया
छ. संभाजीनगर - १५
जालना - ६
बीड - ७
धाराशिव - ८

राज्यात १८१ निलंबन बाकी लाचखोर कर्मचाऱ्यांना अद्यापही संबंधित विभागाने निलंबित केलेले नाही. यात वर्ग १ चे ३६, वर्ग २ च्या ३२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वर्ग ३ चे १०७ तर वर्ग ४ चे ६ कर्मचारी आहेत. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात नगरविकास, उद्योग व उर्जा, आरोग्य, विधी व न्याय, धर्मायदाय आयुक्त, नगर परिषद, परिवहन मिळून ६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईच झाली नाही.

खाते - निलंबन प्रलंबित
ग्रामविकास/पंचायत समिती - ४
शिक्षण व क्रिडा - ७
महसुल - ३
पोलिस - ३
सहकान पणन/वस्त्रोद्योग - २

ही तर हद्दच
लाच घेतल्याच्या गुन्ह्यात शिक्षा लागूनही राज्यातील २१ जणांची बडतर्फीची प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील महसुचे १, ग्रामविकास १ तर सहकारी पणन चा १ कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

अडवणूक होत असेल, तर तक्रार करा
लाचेची कारवाई होताच संबंधित विभागप्रमुखांना पत्र पाठवून कळवले जाते. त्यानंतर निलंबणाची कारवाई त्याच विभागाकडून अपेक्षित असते. सरकारी खात्यांत लाचेसाठी कामे अडवली जात असतील, तर १०६४ किंवा https://acbmaharashtra.net/marathi/bribe_complaint या संकेतस्थळावरही थेट तक्रार दाखल करू शकता.
- संदीप आटोळे, पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.

Web Title: Even though paid a good salary, was caught taking bribes, and now suspension delayed by the grace of my boss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.