आई मरून पडली तरी दारुड्या मुलांना उमगलेच नाही, नशेत मृतदेहाशेजारीच राहिले झोपून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 07:21 PM2022-05-13T19:21:25+5:302022-05-13T19:22:07+5:30
पोलिसांच्या मदतीने स्वयंसेवी संस्थेकडून अंत्यसंस्कार
औरंगाबाद : कुटुंबातील वादामुळे नवरा गावाकडे निघून गेलेला... सोबत असलेली दोन्ही मुले दारूच्या आहारी गेलेली. या मुलांना आईचा मृत्यू झाल्याचेही माहीत नव्हते. मृत आईच्या शेजारीच दोघे अंथरूण टाकून झोपी गेले. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मग पोलिसांना बोलावून घेत मृतदेह घाटीत नेला. ही घटना रविवारी रात्री घडली.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडको एन-९ येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षांच्या महिलेला तीन मुले आहेत. एक दुसरीकडे राहतो. पती नांदेडला राहतो, तर महिला दोन मुलांसोबत राहत होती. तिला संधिवाताचा आजार होता. तिच्याजवळ असलेली दोन्ही मुले दारूच्या आहारी गेली आहेत. रविवारी रात्री दोघे भाऊ दारू पिऊन घरी आले. आई मरून पडलेली होती; पण दारूच्या नशेत असल्यामुळे दोघांना ते समजलेही नाही. ते जवळच झोपी गेले. रात्री दहा वाजता शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली. घरात डोकावून पाहिले असता वृद्धा मृतावस्थेत, तर दोघे भाऊ झोपलेले होते.
ही माहिती सिडको पोलिसांना दिल्यानंतर निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनात हवालदार सुभाष शेवाळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही भावांना झाेपेतून उठविले. तेव्हा खूप दारू प्यायल्यामुळे त्यांना उभेही राहता येत नव्हते. पोलिसांनी एका युवकाच्या मदतीने मृतदेह घाटी रुग्णालयात नेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोन्हीपैकी एक मुलगा पुन्हा दारू पिऊन आला. नशेत तो दिवसभर घरात पडून होता. आईच्या अंत्यसंस्कारालाही तो आला नाही. दुसरा मात्र आला होता. पोलिसांनी काही नातेवाइकांच्या मदतीने एका स्वयंसेवी संस्थेमार्फत महिलेवर अंत्यसंस्कार केले.
दोघांच्याही पत्नीने सोडले
वृद्ध महिलेच्या दोन्ही मुलांचा विवाह झालेला आहे. दारूच्या व्यसनामुळे दोघांच्याही पत्नी त्यांना सोडून गेलेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.