युती झाली असली तरी खैरे हेच उमेदवार हे माहिती नाही;भाजपच्या भूमिकेने युतीतील कुरबुरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:03 PM2019-03-05T13:03:29+5:302019-03-05T13:08:01+5:30
युती झाली असली तरी खैरे हेच उमेदवार हे माहिती नाही; शिवसेनेच्या स्तंभपूजनावर भाजपची भूमिका
औरंगाबाद : शिवसेना-भाजपचे वरिष्ठ पातळीवर मनोमिलन झाले असले तरी मतदारसंघनिहाय मनोमिलन होण्याची चिन्हे अजून निर्माण झालेली नाहीत. युती झाली असली तरी खा. चंद्रकांत खैरे हेच युतीचे उमेदवार असल्याचे माहीत नाही, तसेच जिल्हा परिषदेत शिवसेना जोपर्यंत काँग्रेसशी युती तोडत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतल्यामुळे युतीतील कुरबुरी निवडणुकीत रंगत आणतील, असे दिसते आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत जल्लोषात स्तंभपूजनाचा कार्यक्रम झाला, यावेळी मात्र जल्लोष नसल्यामुळे खैरेंना हा अपशकुन तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त समर्थनगर येथे खा. चंद्रकांत खैरे यांनी सपत्नीक प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन केले. महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाला भाजपच्या एखादा वगळता सर्वांनीच दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यातच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाला फारसे महत्त्व न दिल्यामुळे अंतर्गत गटबाजीही समोर आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सेनेकडून अनेकदा फोन गेले. मात्र, कार्यक्रमस्थळी कुणीही फिरकले नसल्यामुळे भाजप खैरेंवर नाराज असल्याचे दिसले.
भाजपची भूमिका अशी
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांनी सांगितले, युती झाली हे आम्हाला मान्य आहे. जागा शिवसेनेला सुटेल याची आम्हाला कल्पना आहे; परंतु शिवसेनेने उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर केल्याचे आम्हाला माहिती नाही. भाजपची मागणी अशी आहे, शिवसेनेने जि.प.मध्ये असलेली काँग्रेसची अभद्र युती तोडावी. तरच आम्ही त्यांना पूर्ण मदत करू. आमची कुणासोबत युती असेल तर ती युती आम्ही तात्काळ तोडू, आम्हाला वरून युतीचा आदेश आहे, आम्ही शिवसेनेचे काम करू; परंतु खैरे यांनी शिवसेना नेते म्हणून आदेश देत जि.प.मधील कॉंग्रेससोबतची युती तोडावी व भाजपसोबत युती करावी, ही आमची मागणी आहे. जि.प.मध्ये सेना-भाजपमध्ये युती झाली तरच आम्ही निवडणुकीत मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकू.
तिघेही आले उशिरा
आ. संजय शिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे तिघेही कार्यक्रमाला उशिरा पोहोचले. खा. खैरे आल्यानंतर बऱ्याच वेळेनंतर हे तिघे आले. आ. अतुल सावे आले; परंतु तेही थोडा वेळ थांबून निघून गेले.