सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहातही दर्जेदार, सकस पुस्तकांना अफाट मागणी
By बापू सोळुंके | Published: December 2, 2023 07:18 PM2023-12-02T19:18:27+5:302023-12-02T19:18:54+5:30
दरवर्षी प्रादेशिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तकांची विक्री होते आणि ती वाचलीही जातात
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर येथे आजपासून मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे. ग्रामीण भागातील प्रादेशिक संमेलनाची साहित्यप्रेमींना उत्सुकता लागली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाचनसंस्कृती मागे पडत असल्याची चर्चा होत असते. असे असले तरी दरवर्षी प्रादेशिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तकांची विक्री होते आणि ती वाचलीही जातात, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. वाचकांना दर्जेदार कथा, कादंबऱ्या आणि कविताही वाचायला आवडतात. तसेच माहितीपर पुस्तकांचीही चोखंदळ वाचकांकडून मागणी असते, असेही लेखक, प्रकाशकांनी नमूद केले.
ई कॉमर्स प्लॉटफार्मवरूनही पुस्तकांची विक्री
सोशल मीडियामुळे पुस्तके वाचली जात नाही, असा भ्रम आहे. उलट सोशल मीडियामुळे पुस्तके विकली जातात आणि वाचलीही जातात. पारंपरिक पुस्तकांसोबतच आता शेअर मार्केटची माहिती देणाऱ्यांसारख्या माहितीपूर पुस्तकांचा वाचक वाढला आहे. पूर्वी केवळ पुस्तक प्रकाशनातच पुस्तकांची विक्री होत होती. आता ॲमेझॉनसारख्या ई कॉमर्स प्लॉटफार्मवरूनही पुस्तकांची विक्री होते. साहित्य संमेलनात आम्ही पुस्तक विक्रीचे दोन स्टॉल घेतले आहे.
- साकेत भांड, संचालक, साकेत प्रकाशन.
विक्री घटण्याचे कारण वाढलेल्या किमती
गंगापूर येथे होत असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात आम्ही तीन स्टॉल लावत आहोत. उद्या किती खरोखरच कमी झाली आहे. आजकाल पुस्तकांचे वाचन आणि विक्री फार खरोखरच कमी झाली आहे. ऑनलाइन विक्री होते, असे म्हटले जाते, पण ऑनलाइन विक्रीचे प्रमाण केवळ एक ते दीड टक्का आहे. पुस्तक विक्री घटण्याचे कारण पुस्तकाच्या वाढलेल्या किमती हे एक आहे. लेखक, कवींना स्वत:ची पुस्तके इतरांनी वाचावी, असे वाटते, पण ते इतरांची पुस्तके विकत घेऊन वाचत नाही, ही शोकांतिका आहे.
-कुंडलिक अतकरे, अध्यक्ष, मराठी प्रकाशक परिषद.
अनुवादित पुस्तकांनाही मागणी वाढली
वाचकांना केंद्रबिंदू ठेवून प्रकाशकाने दर्जेदार लेखक शोधून आणि त्यांची पुस्तके छापली तर अशा पुस्तकांचे वाचकांकडून स्वागत होते. आजकाल मात्र हौशी लेखकांची पुस्तके प्रकाशित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा पुस्तकांना वाचकांकडून मागणी नसते. मात्र आजही जुन्या लेखकांच्या कथा, कादंबऱ्यांना वाचकांची मागणी आहे. शिवाय देश, विदेशातील बेस्ट सेलर पुस्तकांचा अनुवादित पुस्तकांनाही मागणी वाढली आहे. ऑनलाइनही विक्री चांगल्या प्रकारे होते. दर्जेदार पुस्तकांची निर्मिती होण्यासाठी प्रकाशक, लेखक आणि वाचक यांनी एकत्र येऊन चळवळ निर्माण करणे गरजचे आहे.
- विलास फुटाणे, संचालक, आदित्य प्रकाशन.
वाचक नावीन्यपूर्ण लेखनाच्या शोधात
लेखक जी निर्मिती करतो, ती वास्तव जीवनातील संवेदनशीलतेने केलेली असेल तर वाचक त्यात गुंतून पडतो. विषय सामाजिक, राजकीय अथवा सांस्कृतिक असो, त्या विषयाची अभिव्यक्ती करताना, लेखक ज्या पद्धतीने करतो ती इतरांपेक्षा वेगळी असेल तर वाचक त्या लेखनात गुंतून पडतो. मग ती कथा असो, कादंबरी असो किंवा कविता असो. या सर्व लेखनाविषयी वाचकाच्या मनात प्रेम निर्माण होते आणि तो अशा नावीन्यपूर्ण लेखनाच्या आणि लेखकाच्या सतत शोधात असतो. मग अशी पुस्तके तो विकत घेऊनसुद्धा वाचत असतो.
- डॉ. दादा गोरे, कार्यवाह, मराठवाडा साहित्य परिषद.
समाज, संस्कृती, साहित्य याची अभिरुचीदेखील संपन्न
वाचनसंस्कृती नामशेष झाली, असे म्हणणे चुकीचे आहे. साहित्य संमेलनात पुस्तके विकत घेतली जातात आणि ती वाचली जातात. जी प्रादेशिक संमेलने आहेत, त्या प्रादेशिक संमेलनात आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी पुस्तके विकत घेतली जातात, तीही वाचण्यासाठीच घेतली जातात. त्या लेखकाचा एक वाचकवर्ग तयार झालेला असतो. हा वाचक वर्ग केवळ कविता, कथा एवढ्यापुरता मर्यादित नाही. समीक्षा, संशोधन, वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाकडेही वाचक आकृष्ट झालेला असतो. म्हणून समाज, संस्कृती, साहित्य याची अभिरुचीदेखील संपन्नच होत आली आहे.
- डॉ. ऋषिकेश कांबळे, साहित्यिक.