दुपारच्या आनंदावर संध्याकाळी विरजण; लॉकडाऊन ‘जैसेे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:04 AM2021-06-04T04:04:07+5:302021-06-04T04:04:07+5:30
औरंगाबाद : राज्यातील १८ जिल्ह्यातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह दर कमी असल्यामुळे सर्व काही अनलॉक करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन ...
औरंगाबाद : राज्यातील १८ जिल्ह्यातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह दर कमी असल्यामुळे सर्व काही अनलॉक करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर करताच दुपारनंतर औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सगळ्या बाजारपेठेत आनंदाला उधाण आले. त्यांच्या घोषणेचा टर्न संध्याकाळी यु-टर्नच्या रुपात बदलल्यानंतर व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह जनसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले.
सर्वसामान्यांपासून सर्व व्यावसायिकांना सरकारी विसंवादाने बुचकळ्यात पाडल्यामुळे नेमका हा काय प्रकार यासाठी एकमेकांना फोन करून व्यापाऱ्यांनी सत्य काय आहे हे विचारले. प्रशासकीय वर्तुळात कनिष्ठांपासून वरिष्ठ ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. प्रत्येकाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे बोट दाखवून हात वर केले.
दुपारी अनलॉकची बातमी येताच सर्व क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले होते. हॉटेल चालकांनी तातडीने साफसफाई करण्यास सुरूवात केली. तर शहरातील सर्व मॉलच्या आवारात व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शासन निर्णयाबाबत उत्सुकतेने विचारणा केली. जिल्ह्यात सध्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व व्यापारास मुभा दिलेली आहे. बहुतांश जणांनी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला संपर्क करून जिल्ह्यात सर्व काही उघडणार आहे काय, याची माहिती घेतली. मात्र सायंकाळी अनेकांची निराशाच झाली.
चौकट...
३४५८ पैकी २ हजार ऑक्सिजन खाटा
जिल्ह्यात सर्व मिळून ३ हजार ४५८ पैकी अंदाजे २ हजार ऑक्सिजन खाटा रिक्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनलॉकच्या घोषणेनंतर प्रशासनाने ऑक्सिजन खाटांची उपलब्धता किती आहे, याची माहिती संकलित करण्यास सुरूवात केली आहे.
पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट
एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा ११.४४ टक्के एवढा होता. तो मागील महिनाभरात कमी कमी होत ३१ मे रोजी २.८३ वर आला. सध्या २.२६ टक्के आहे.
लॉकडाऊन जैसे थे राहील- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांच्या खाली आहे. ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेची माहिती संकलित केली जात आहे. वरिष्ठ पातळीवर विचारणा केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही. औरंगाबादमध्ये लॉकडाऊन ‘जैसे थे’ राहील, याबाबत सीएमओ कार्यालयाकडून सूचना आल्यानंतर काही माहिती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कभी खुशी कभी गम
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले, अनलॉकचा निर्णय येताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर पुन्हा निर्णय बदलण्याबाबतची माहिती समोर आली. त्यामुळे ‘कभी खुशी तर कभी गम’ असा अनुभव आम्ही घेतला. सर्व अनलॉक झाले असते तर आनंदच झाला असता.
या निर्णयामुळे काळजी वाढली होती
एकदम अनलॉक म्हटले असते तर नागरिकांचा भडका उडाला असता. शिवाय हॉटेलमध्ये स्टाफ देखील नाही, पूर्ण सेवा देण्यासाठी. अनलॉकची पूर्वकल्पना दिली तर तयारी करता येईल, असे औरंगाबाद जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.
कॅप्शन...
अनलॉक केल्याचे दुपारी जाहीर झाल्यानंतर पद्मपुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये साफसफाई सुरु झाली.