अखेर ब्रम्हगव्हाण योजना चितळे समितीच्या कचाट्यातून सुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:05 AM2021-07-31T04:05:21+5:302021-07-31T04:05:21+5:30
औरंगाबाद : पैठण तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना (टप्पा क्र. २) ही योजना चितळे समितीच्या कचाट्यातून ...
औरंगाबाद : पैठण तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना (टप्पा क्र. २) ही योजना चितळे समितीच्या कचाट्यातून सुटली आहे. राज्य सरकारने योजना दोषमुक्त असल्याचे जाहीर केल्याने अंदाजे एक हजार कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे. चितळे समितीने योजनेबाबत काढलेल्या त्रुटींची पूर्तता जलसंपदा विभागाकडून केली जाणार आहे.
सिंचन प्रकल्पांबाबत विशेष चौकशी करणाऱ्या माधवराव चितळे समितीने राज्यातील १६ प्रकल्पांत अनियमितता झाल्याचे ताशेरे ओढल्याने ते सर्व प्रकल्प दोषयुक्त ठरविले होते. त्यात ब्रम्हगव्हाण योजनेचाही समावेश होता. योजनेशी संबंधितांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे इतर १५ योजना दोषमुक्त झाल्या; परंतु ब्रह्मगव्हाण सिंचन योजना सहा वर्षांपासून समितीने ओढलेल्या ताशेऱ्यांच्या कचाट्यातून सुटत नव्हती.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, उपअभियंता जयंत गायकवाड, आदींनी राज्य पातळीवरील तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठपुरावा केल्यामुळे योजना दोषमुक्त झाल्याचे सरकारने गुरुवारी महामंडळाला एका पत्रान्वये कळविले.
आता योजनेला गती मिळणार
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील खेर्डा लघु तलावापर्यंत कालवा वितरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. प्रकल्पासाठीच्या पीक रचनेला कृषी आयुक्तांची मंजुरी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र जलसपंत्ती नियमन प्राधिकरण, पर्यावरण, केंद्रीय जल आयोगाच्या मान्यता मिळाल्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून प्रकल्पास गती येईल, अशी अपेक्षा लघुपाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी व्यक्त केली.