अखेर रस्त्यांची होणार डागडुजी; पावसाळ्यानंतर मनपा निधीतून ३९ रस्त्यांचे डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:18 PM2021-07-31T18:18:48+5:302021-07-31T18:20:01+5:30
यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
औरंगाबाद : शहरातील अनेक प्रमुख रस्ते खराब झाले आहेत. मागील काही वर्षांपासून खराब रस्त्यांची डागडुजीही करायला महापालिका तयार नाही. आता ३९ रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावर ५७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, आठ ते दहा दिवसांत त्यासंबंधीच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
खड्ड्यांचे शहर, अशी प्रतिमा अलीकडे काही वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. राज्य शासनाने तीन टप्प्यांत महापालिकेला निधी दिला. पहिल्या टप्प्यात २४ कोटी, नंतर १०० कोटी, गतवर्षी १५२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. शासनाच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे व्यापक प्रमाणात करण्यात आली; परंतु अनेक अत्यावश्यक रस्त्यांची कामे राहून गेली होती. या रस्त्यांची कामे महापालिका निधीतून करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५७ कोटींची कामे केली जाणार आहेत. या कामांबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले की, ५७ कोटींच्या रस्त्यांच्या कामांसाठी निविदा काढण्याची फाइल मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. फाइल मंजूर झाल्यावर येत्या आठ-दहा दिवसांत निविदा काढण्यात येईल. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यावर रस्त्यांची कामे सुरू केली जातील. सध्या पावसाळा असल्याने कामे सुरू करणे शक्य नाही. पावसाळा संपल्यावरच ही कामे सुरू होतील. सध्या ३९ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून महापालिकेने सिमेंट रस्त्यांची कामे पूर्णपणे बंद केली आहेत.