औरंगाबादेत कधी रिपरिप;कधी जोरकस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:47 PM2018-07-16T23:47:27+5:302018-07-16T23:47:56+5:30
शहराच्यादृष्टीने सोमवारचा दिवस खऱ्या अर्थाने पावसाचा दिवस ठरला. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेला पाऊस कधी रिपरिप तर कधी जोरकसपणे रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराच्यादृष्टीने सोमवारचा दिवस खऱ्या अर्थाने पावसाचा दिवस ठरला. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेला पाऊस कधी रिपरिप तर कधी जोरकसपणे रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्याने जोरदार हजेरी लावली. तब्बल ११ दिवसांनंतर जोरदार सरींनी शहर चिंब झाले. सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत ३७.८ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली.
५ जुलै रोजी पावसाने शहराला अक्षरश: धुऊन काढले होते. दोन तासांत ४४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. या तुलनेत सोमवारी पाऊस कमीच होता.
सोमवारी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झाला. दिवसभर अधूनमधून काही मिनिटांसाठी विश्रांती घेत पाऊस पडत होता. दुपारी ३ वाजेपर्यंत पडणाºया रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. भुरभुर पडणाºया पावसाचा आनंद अनेकांनी घेतला. दुपारी ३ वाजेनंतर मात्र पावसाचा वेग वाढला. ४ वाजेच्या सुमारास जवळपास १५ ते २० मिनिटे दमदार बरसला.
पावसामुळे रेल्वेस्टेशन, जालना रोडसह ठिकठिकाणी रस्त्यावर, रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आकाशवाणी, दूध डेअरी चौकात वाहनचालकांची सर्वाधिक तारांबळ उडाली. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.
५ वाजेच्या सुमारास आकाशवाणी आणि दूध डेअरी या दोन्ही चौकात वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पाऊस आणि वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. शनिवारी रिमझिम पाऊस होता. रविवारी त्याने पाठ फिरविली. सोमवारी दिवसभराच्या पावसाने पुन्हा शहर चिंब झाले.
सायंकाळीही बरसला
श्रेयनगर परिसरातील झाडाची फांदी दुपारी तुटली. यासंदर्भात नागरिकांनी संपर्क साधताच अग्निशमन दलाने मदतीसाठी धाव घेतली.
चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत
14.8मि. मी. पावसाची नोंद झाली. सायंकाळीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभराच्या कामानंतर घरी परतणाºया नोकरदार, कामगार वर्गाची धावपळ उडाली.