खासगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे होणार ऑडिट; दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा विभागीय आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 02:17 PM2021-04-20T14:17:03+5:302021-04-20T14:21:08+5:30
corona virus in Aurangabad जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असून, लिक्विड ऑक्सिजनसाठाही जिल्ह्यात मुबलक उपलब्ध आहे.
औरंगाबाद : सर्व खासगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असून, त्या रुग्णालयांनी लेखापरीक्षकाचे नाव, संपर्क क्रमांक, रुग्णालय परिसरात दर्शनीस्थळी लावावे; अन्यथा दोषी रुग्णालयांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी येथे आयोजित एका बैठकीत दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा सुयोग्य वापरासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असून, लिक्विड ऑक्सिजनसाठाही जिल्ह्यात मुबलक उपलब्ध आहे. परंतु, भविष्यातील परिस्थितीचा विचार करून आताच नियोजन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, आमदार अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रेमडेसिविरला पर्यायी इंजेक्शन वापरा
रेमडेसिविर इंजेक्शनला पर्याय उपलब्ध असणाऱ्या टोसलीझूमॅब इंजेक्शनचा वापर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली. गरज असणाऱ्या रुग्णांनांच ऑक्सिजन लावण्यात यावा तसेच ऑक्सिजन वापरताना अनावश्यक वापर, गळती इत्यादी बाबीचा जाणीवपूर्वक विचार करावा तरच भविष्यातील ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीला आळा घालणे शक्य होईल, असे ते म्हणाले.
खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजन प्लान्ट उभारावा
जिल्ह्यात मुबलक बेड उपलब्ध असून १ हजार आयसीयू बेडदेखील उपलब्ध आहेत. जिल्ह्यात ६१ हजार किलोलीटर लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध आहे. रेमडेसिविर इंजेक्शन साठादेखील जिल्ह्यात ६ हजार इतका आहे. ३० पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या खासगी रुग्णालयांनीदेखील ऑक्सिजनकरिता केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट तत्काळ उभारावा, मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यांचे मॉनिटरिंग करण्यात यावे, अशी सूचना केंद्रेकर यांनी केली.