शिंदेच्या बंडाबाबत मातोश्रीवरून आता रोज नवीन पुड्या सोडल्या जात आहेत: अब्दुल सत्तार
By बापू सोळुंके | Published: April 13, 2023 06:58 PM2023-04-13T18:58:27+5:302023-04-13T18:58:46+5:30
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची आदित्य ठाकरेंच्या विधानावर टिका
छत्रपती संभाजीनगर: बंड करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन् रडले हाेते, असा खळबळजनक गौप्यस्फोट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केल्याचे विधान हे मातोश्रीवरून नवीन पुडी सोडण्याच्या प्रकारातील असल्याचे सांगत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या विधानाला अर्थ नसल्याचे पत्रकारांना सांगितले.
मतदार संघातील कामासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर कृषीमंत्र्यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिंदे हे मातोश्रीवर रडल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले असते तर कदाचित त्यांच्यावर विश्वास ठेवता आला असता, मात्र हे विधान आदित्यने केले आहेत. शिंदे यांना राजकारणाचा जेवढा अनुभव आहे, त्यापेक्षा कमी वय आदित्यचे आहे. सत्ता गेल्यापासून या बंडाबाबत मातोश्रीवरुन सतत नवीन पुड्या सोडल्या जातात. यातीलच एक ही पुडी असल्याचे सत्तार यांनी नमूद केले.
शिवसेनेसारखा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजप करीत असल्याच्या आरोप होत आहे, याकडे तुम्ही कसे पहाता या, प्रश्नाचे उत्तर देताना कृषीमंत्री म्हणाले की, ईडी ही स्वायत्त संस्था आहे, कोणी कुठे अनियमितता केली असेल तर ईडी चौकशी करू शकते. मात्र याचा अर्थ असा नाही, की अजीतदादांनी सोबत यावे, म्हणून ईडीचा दबाव टाकला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल
राज्यातील १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. हा निर्णय कधी येईल हे सांगता येत नाही. हा निर्णय जसा येईल,तसा आम्ही स्विकारू असे नमूद करीत या निकालानंतरच राज्यातील राजकीय ढगाळ वातावरण स्पष्ट होईल, अथवा गारपीठ होईल हे स्पष्ट होईल.