औरंगाबादच्या प्रत्येक चौकावर भिकाऱ्यांचेच ‘राज्य’; नजर वळवली तर येतात अंगचटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 07:59 PM2022-08-24T19:59:46+5:302022-08-24T20:00:40+5:30
आपल्या देशात भीक मागणे गुन्हा आहे. भीक मागणाऱ्यांवर पोलीस आणि समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत.
औरंगाबाद : शहरातील विविध चौक आणि वाहतूक सिग्नलवर गेल्या काही महिन्यांपासून भिकाऱ्यांचेच राज्य असल्याचे पाहायला मिळत आहे. अल्पवयीन मुले, मुली आणि महिलांकडून भीक मागून घेतली जात आहे.
लोकांनी भीक द्यावी यासाठी ते अपंग असल्याचे दाखविण्यासाठी काखेत कुबड्या घेऊन उभे राहतात. यासोबतच शहरातील बहुतेक सिग्नलवर तृतीयपंथीयांकडूनही वाहनचालकांकडे पैशाची मागणी केली जाते. पोलिसांनी त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. मुकुंदवाडी चौक, वसंतराव नाईक चौक, उच्च न्यायालय वाहतूक सिग्नल, गजानन महाराज मंदिर चौक, सेव्हन हिल, महावीर चौक, शहानूरमियाँ दर्गा, मिलकॉर्नर चौक, सिडको एन-१ चौक इ. ठिकाणी भीक मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अल्पवयीन मुले-मुली कारच्या काचा स्वच्छ करून कारमध्ये बसलेल्या व्यक्तीना पैसे मागतात. आवश्यकता नसतानाही कारची काच कपड्याने पुसणे आणि पैशांची मागणी करण्याचा प्रकार वाढला आहे. प्रमुख चाैकात आणि बीड बायपासवर तृतीयपंथीयांची वेशभूषा करून पैसे मागणाऱ्यांचाही त्रास वाढला आहे. प्रत्येक चौकात ही मंडळी टाळ्या वाजवून वाहनचालकांकडे पैशाची मागणी करतात. जे लोक पैसे देत नाहीत, त्यांना उलटसुलट बोलतात.
त्याने चक्क साडीच वर केली
सेव्हन हिल येथे तृतीयपंथीयांची वेशभूषा केेलेला एक जण प्रत्येक वाहनाजवळ जाऊन टाळी वाजवून पैसे घेतल्यानंतर तो एका दुचाकीस्वार दोन तरुणांजवळ गेला. पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने तुम्ही ओरिजनल नाहीत, असे म्हणून पैसे देण्यास नकार दिला. तृतीयपंथीय वेशधारीने थयथयाट करीत चक्क स्वत:च्या अंगावरील साडी कमरेपर्यंत वर केली. हा किळसवाणा प्रकार पाहून अशा लोकांवर पेालीस कारवाई का करीत नाहीत, असा सवाल वाहनचालक करीत होते.
भीक मागणे गुन्हा
आपल्या देशात भीक मागणे गुन्हा आहे. भीक मागणाऱ्यांवर पोलीस आणि समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत. त्यांना भीक मागताना पकडल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले जाते. मानसिक संतुलन ठीक नसल्यास त्यांना मानसोपचार केंद्रात पाठविले जाते. शिवाय महिलांना अहमदनगर येथील भिक्षागृहात, तर पुरुष भिकाऱ्यांना पुण्यातील केंद्रात पाठविण्यात येते. तेथे त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशनही केले जाते.
दोन वर्षांपूर्वी झाली होती २६ भिकाऱ्यांवर कारवाई
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी सामाजिक कार्यकर्ता वैभव घुले यांच्या मदतीने पोलिसांना सोबत घेऊन शहरातील २६ भिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यानंतर मात्र कारवाई झाल्याचे दिसत नाही.