दररोज चार ते नऊ तास मुले मोबाईल, टीव्ही पाहण्यात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:30 PM2019-01-19T18:30:12+5:302019-01-19T18:30:33+5:30
डिजिटल युग अवतरले आहे. शाळेत जाणारी मुले दिवसातील तब्बल ४ ते ९तास मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनसमोर असतात. याशिवाय सोशल मीडियातील त्यांची उपस्थिती हा प्रकार चिंताजनक असल्याचे एका पाहणीत समोर आल्याची माहिती रिस्पॉन्सिबल नेटीझम प्रकल्पाचे संचालक उन्मेश जोशी यांनी दिली.
औरंगाबाद : डिजिटल युग अवतरले आहे. शाळेत जाणारी मुले दिवसातील तब्बल ४ ते ९तास मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनसमोर असतात. याशिवाय सोशल मीडियातील त्यांची उपस्थिती हा प्रकार चिंताजनक असल्याचे एका पाहणीत समोर आल्याची माहिती रिस्पॉन्सिबल नेटीझम प्रकल्पाचे संचालक उन्मेश जोशी यांनी दिली. यासंदर्भात पालकांनी काळजी घेणे गरजचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
माध्यमिक शिक्षण विभाग, राज्य बालहक्क संरक्षण आयोग, अहान फाऊंडेशनतर्फे ‘तिसºया रिस्पॉन्सिबल नेटीझम नॅशनल सायबर सायकलॉजी’ या विषयावर जिल्ह्यातील ३०० मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण, माधुरी अदवंत, डॉ. अनुराधा सोवनी, उन्मेश जोशी, सोनाली पाटणकर, तुषार भगत आदी उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील विविध भागांत केलेल्या इंटरनेटसंदर्भातील सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आल्याचे उन्मेश जोशी यांनी सांगितले.
सध्या बहुतांश मुलांचे पालक सोशल मीडियातील फेसबुक, टिष्ट्वटरवर आहेत. यामुळे त्यांच्या मुलांनी त्याऐवजी इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट या माध्यमांचा वापर सुरू केला. याठिकाणी सर्वाधिक किशोरवयीन मुले आहेत. प्रत्येक सेकंदाला लाखो छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड केली जात आहेत. यातूनच सायबर क्राईम वाढत आहे. एकट्या मुंबईत १६.४ मिलियन इंटरनेटधारक आहेत. प्रत्येक १० सेकंदाला एक सायबर क्राईम नोंदवला जात आहे. प्रत्येक ५ चॅटमधील एक चॅट गैरमार्गाचा आहे. यातून सर्वाधिक मुलांची रॅगिंग घेतली जात असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस या संस्थेच्या केलेल्या पाहणीनुसार १० ते १८ या वयोगटातील ३३ टक्के मुले रॅगिंगचे शिकार आहेत. मुले एकदा का जाळ्यात अडकली की, त्यांच्याकडून न्यूड छायाचित्रे काढून घेणे, पोर्न साईटस् पाहायला लावणे, असे प्रकारही घडत आहेत. सोशल मीडियावर ३ पैकी २ मुलांची रॅगिंग होत आहे. यानंतर सायबर गुन्ह्याचे सर्वाधिक उल्लंघन होत असलेला प्रकार म्हणजे हॅकिंग. पूर्वी शाळांमध्ये सर्वाधिक धष्ट-पुष्ट असलेल्या मुलांकडे सर्वाधिक मुलांचा ओढा होता.
आता सर्वाधिक महागडा मोबाईल असलेल्या मुलाच्या जवळ मित्रांचा घोळका जमलेला दिसतो. मोबाईलच्या माध्यमातून वायफायचे पासवर्ड, मित्रांचे सोशल मीडियातील अकाऊंट हॅक करण्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय एखाद्याचा पाठलाग करणे, मॉर्फिन करून बदनामी होईल, अशी छायाचित्रे तयार करण्याचे प्रकारही वाढले आहेत. चाईल्ड आॅनलाईन ग्रुमिंगचा प्रकारही वाढला असल्याचे जोशी यांनी सांगितले. यानंतर मुलांच्या मानसिक स्थितीबद्दल एसएनडीटी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमख डॉ. अनुराधा सोवनी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सोशल मीडिया हे विषापेक्षाही भयंकर आहे. आपण अल्कोहल, कोकीन, हेरॉईन, निकोटीनचे सेवन केल्यानंतर मुलगा बिघडला असे मानतो. मात्र, त्यापेक्षाही सोशल मीडियाची सवय गंभीर आहे. यातून मुले गुन्हेगारी जगताकडे वळत आहेत. त्याशिवाय पोर्नग्राफी, गेमिंग, शॉपिंग, सेक्सी दिसणारे चेहरे पाहण्याचे व्यसन मुलांना जडले असल्याचे डॉ. सोवनी यांनी सांगितले. उद्घाटन सत्रात प्रवीण घुगे, डॉ. बी.बी. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय देशमुख यांनी केले. आभार तुषार भगत यांनी मानले.
आॅनलाईन जुगार वाढतो आहे
मुले मोबाईल, संगणकावर गेम खेळतात. अनेक गेम खेळताना पैसे लावतात. यातून आॅनलाईन जुगाराचे (गॅम्बलिंग) प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. गेम खेळण्यासाठी लागणारे पैसे आई-वडिलांकडूनच घेतात. जेव्हा पैसे उपलब्ध होत नाहीत तेव्हा घरातच चोरी करीत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आल्याचे जोशी यांनी सांगितले.
डिजिटल युगातील पालक होण्यासाठी हे करा
- इंटरनेटच्या वापराचे फायदे, तोटे आणि धोके स्वत: शिका, समजून घ्या आणि आपल्या मुलांना समजावून सांगा.
- सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षिततेबाबत माहिती स्वत: शिका आणि आपल्या मुलांनादेखील शिकवा.
- हॅकिंग, सेक्सटिंग, फेक प्रोफाईल तयार करणे, फोटो मॉर्फिन, सायबर बुलिंग हे सर्व सायबर गुन्हे असून, कायद्यांतर्गत शिक्षेस पात्र आहेत.
- १३ वर्षांखालील मुलांना स्वत:चे गॅजेट, स्मार्ट फोन देऊ नये.
- मुलांच्या खोलीत संगणक न ठेवता बैठकीच्या खोलीत ठेवावे, जेणेकरून मुलांच्या संगणकावरील हालचालींवर लक्ष ठेवता येईल.
-जेवताना संगणक, मोबाईलचा वापर होणार नाही हे कटाक्षाने पाळा.
- १३ वर्षांच्या खालच्या मुलांशी सोशल मीडियावर मैत्री करू नका.