सगळ्यांना फुलण्याची संधी मिळणे आवश्यक

By Admin | Published: March 20, 2016 12:34 AM2016-03-20T00:34:50+5:302016-03-20T00:46:10+5:30

उस्मानाबाद : तथागत बुध्द आणि संत तुकाराम यांनी सर्वसामान्यांच्या सुखाचा विचार केला. सगळ्यांना त्यांच्या आयुष्यात फुलण्याची संधी मिळाली पाहिजे,

Everyone has the opportunity to blossom | सगळ्यांना फुलण्याची संधी मिळणे आवश्यक

सगळ्यांना फुलण्याची संधी मिळणे आवश्यक

googlenewsNext


उस्मानाबाद : तथागत बुध्द आणि संत तुकाराम यांनी सर्वसामान्यांच्या सुखाचा विचार केला. सगळ्यांना त्यांच्या आयुष्यात फुलण्याची संधी मिळाली पाहिजे, असा विचार त्यांनी दिला. हा विचार आत्मसात करण्याची गरज डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली. वर्ण व जातीव्यवस्थेतून आलेल्या दुभंगलेपणामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. जाती-धर्माचा दुराभिमान टाळला तरच भारताला भवितव्य असल्याचा इशाराही डॉ. साळुंखे यांनी यावेळी दिला.
येथील व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने शहर पोलिस ठाण्यासमोरील उस्मानाबाद क्लबच्या मैदानावर आयोजित ‘तथागत बुध्द आणि संत तुकाराम’ या विषयावर त्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही मांडणी केली. बुध्दाने कुठेही व्यक्तीवाद मांडलेला नाही. मी व्यक्ती म्हणून महत्त्वाचा नाही तर विचार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विचारांचे आचरण करा, असे ते वारंवार सांगत होते. मी सांगितले ते जसेच्या तसे स्वीकारा, असेही माझे म्हणणे नाही. तर, मी दिलेला विचार सुध्दा तपासून घ्या. तो पटल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करा. बुध्दांच्या या तत्त्वावरून ते किती लोकशाहीवादी होते, याचा प्रत्यय येतो, असे ते म्हणाले. बुध्द आणि संत तुकारामांनी स्वत:च्या संसाराकडे दुर्लक्ष करून समाजाचा, जगाचा संसार केला. दु:ख आहे, त्याला कारण आहे. दु:खाला दूर करण्यासाठी उपाय आहे. हा आष्टांग मार्ग त्यांनी सांगितला. बुध्दांनी सांगितलेल्या चार संपदा सर्वांनी अंगिकारल्यास व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असेही डॉ. साळुंखे यावेळी म्हणाले.
बुध्दानी संसाराचा द्वेश सांगितला नाही, तर ते उभं रहा, प्रयत्न करा असे म्हणाले. संपत्तीची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. याबरोबरच नेहमी कल्याणाची इच्छा असणारे मित्र सोबत असू द्या आणि संसार करताना उत्पन्न आणि खर्च याचा मेळ हवा. या चार संपदांचे पालन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बुध्दाच्या अहिंसेच्या तत्त्वामुळे इतिहासात भारताचा पराभव झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यात तथ्य नाही. बुध्दांचाच विचार पुढे घेऊन गेलेले सम्राट अशोक यांचे अफगाणीस्तानापासून भारतातील दक्षिण सिमेपर्यंत साम्राज्य होते. कारण, सर्वांना फुलण्याची समान संधी त्या काळात बुध्द विचाराने दिली होती. मात्र, नंतरच्या काळात वर्ण, जातीचा दुराभिमान वाढल्याने भारतीय समाज दुभंगला गेला.
भारतीयांच्या पराभवाचं हे महत्त्वाचं कारण होतं. आजची परिस्थिती पाहताना बुध्दांचा तो विचार पुन्हा अंगिकारण्याची वेळ आली आहे. बुध्दाप्रमाणेच संत तुकारामांनीही आपल्या अभंगाच्या माध्यमातून वर्णाचा अभिमान कसला बाळगता, असा सवाल केला होता. प्रयत्नवाद बाळगण्यास तथागत बुध्दासह तुकारामांनीही सांगितले. सबबी सांगू नका, नुसते बोलू नका तर आचरणावर भर द्या, असेच या दोन्ही महापुरुषांचे म्हणणे होते. वर्ण व जातीव्यवस्थेवर या दोन्ही महापुरूषांनी प्रहार केला. जन्म कुठे झाला, हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही कर्म काय करता, यावर तुमचे भवितव्य अवलंबून असल्याचे वारंवार सांगणाऱ्या या महापुरूषांच्या विचारांचे अनुकरण करण्याची आज गरज आहे, असेही डॉ. साळुंखे यावेळी म्हणाले. कार्यक्रमास शहरासह परिसरातील विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Everyone has the opportunity to blossom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.