'आपले अन्न किती सुरक्षित आहे, हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार': विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 09:42 PM2021-11-17T21:42:32+5:302021-11-17T21:42:47+5:30

एफएसएसएआयच्या(FSSAI) वतीने ‘आजादी का अमृत महोत्सवां’तर्गत औरंगाबादमध्ये 'इट राइट' मेळाचे आयोजन.

'Everyone has the right to know how safe their food is': Vijay Darda, FSSAI organizes 'It Right' program in Aurangabad | 'आपले अन्न किती सुरक्षित आहे, हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार': विजय दर्डा

'आपले अन्न किती सुरक्षित आहे, हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार': विजय दर्डा

googlenewsNext

औरंगाबाद: एफएसएसएआयच्या(FSSAI) वतीने ‘आजादी का अमृत महोत्सवां’तर्गत औरंगाबादमध्ये 'इट राइट' मेळाचे आयोजन करण्यात आले. शहरातील कलाग्राम या मेळ्याची सुरुवात झाली. या कार्यक्रमात लोकमत समुहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा आणि लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी अन्न आणि याच्या सुरक्षेबाबात महत्वाची माहिती दिली.

आपले अन्न सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. यासाठी संसदेत कायदा संमत झाला आहे. जेवण कसे आहे यावरून अर्धी लढाई जिंकली जाते. विवाहसमारंभांमधून आपण हे चित्र पाहतो. जेवण चांगल्या दर्जाचे मिळाले तर बाकी सर्व ठीक होते. खाद्यपदार्थांच्या संदर्भातील जनजागृती ‘इट राईट’ मेळ्याच्या माध्यमातून औरंगाबाद येथून झाली आहे. हे शहर नजिकच्या काळात निश्चितच ‘इट राईट सिटी’ म्हणून उदयास येईल, असा विश्वास लोकमत समुहाचे एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केले. 

विजय दर्डा पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाला चांगले आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी २००७ मध्ये कायदा करण्यात आला. त्यावर संसदेत बरीच चर्चा झाली. प्रत्येकाला उत्तम, पौष्टिक अन्न मिळण्याचा अधिकार आहे. त्यासाठी अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण तयार केले. त्यापैकी एक एफएसएसएआय आहे. चांगल्या अन्नासोबतच शुद्ध पाण्याचीही गरज आहे. प्रत्येकाला चांगल्या अन्नाची आवश्यकता आहे. आजही या देशात कोट्यवधी लोकांना अन्न मिळत नाही. पण ज्यांना मिळते ते सुरक्षित मिळतेच असे नाही, असे ते म्हणाले.

प्रतिभा पाटील यांचा किस्सा.....
बराक ओबामा व मिशेल ओबामा यांना राष्ट्रपती भवनात भोजन देण्यात आले, तेव्हा राष्ट्रपती असलेल्या प्रतिभा पाटील प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून होत्या. पाहुण्यांना गरम भोजन कसे देता येईल, यावर त्यांचा कटाक्ष होता. हे स्त्रीच करू शकते. घरीसुध्दा स्त्रीच शिस्त आणते. शुध्दता, सात्विकता आणि गांभीर्य आणते, असे विजय दर्डा म्हणाले.

आईच्या हातचे जेवण सर्वोत्तम
यावेळी बोलताना लोकमत समुहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले की, ‘ईट राईट’ या मोहिमेची सुरुवात पर्यटन राजधानीतून केल्याबद्दल धन्यवाद. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना विधायक कार्याची आवश्यकता आहे. आपण पोटासाठी जगत असताना खाण्याकडे दुर्लक्ष करतो आणि हे पोट आजारांचे मूळ होऊन बसते. आईने बनवलेले जेवण सर्वोत्तम. पण प्रत्येक वेळी आईच्या हातचे जेवण मिळत नाही. त्यामुळे जे खातोय ते स्वच्छ, दर्जेदार हवे. 

या कार्यक्रमात इव्हेंट हेड तथा सहसंचालक संजीव पाटील, उपसंचालक सुकंत चौधरी, सहायक संचालक अमोल जगताप, अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त उदय वंजारी, सहायक आयुक्त अजित मैत्रे, विघ्नेश्वर थेवर, तांत्रिक अधिकारी डॉ. राजकुमार आंधळे आणि सीएफएसओ केदारनाथ कावरे उपस्थित होते. इट राइट मेळ्यात एकूण ८८ स्टॉल आहेत. दिलीप खंडेराय कला मंडलमतर्फे महाराष्ट्राच्या लोककलांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे यांनी केले.

स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
या अंतर्गत मुलांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा, प्रौढांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा, स्लोगन,टॅगलाइन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा अशा ५ थीमवर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे विजय दर्डा व राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली..

महाराष्ट्रात औरंगाबादची निवड .....
एफएसएसएआय विभागीय संचालिका प्रीती चौधरी यांनी प्रास्ताविक केले. केवळ काही सांगितले तर ते विसरले जाते, शिकवले तर शिकतात, पण सहभागी करून घेतले तर कायमचे लक्षात राहते. ‘इट राईट’ मोहीम ही सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. या मोहिमेसाठी देशभरातून ७५ शहरांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात या मोहिमेची सुरुवात औरंगाबाद शहरापासून होत आहे, असे उद्गार प्रीती चौधरी यांनी काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title: 'Everyone has the right to know how safe their food is': Vijay Darda, FSSAI organizes 'It Right' program in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.