सर्वांनी माझा तमाशा करून ठेवला, हे लिहिताना माझे हात कापताहेत, पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 01:01 PM2024-03-23T13:01:56+5:302024-03-23T13:04:20+5:30
विवाहितेच्या आत्महत्येची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती, पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : सूतगिरणी चौकातील संत ज्ञानेश्वरनगरमध्ये राहणाऱ्या नमिता कैलास चौधरी (४०) यांनी गुरुवारी पहाटे आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पती व सासरच्यांवर गंभीर आरोप केलेल्या दोन पानांची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती कैलास चौधरी, सासू मंगल, सासरा विजयसह सासरकडील सहा जणांवर जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नमिता यांचा २००९ मध्ये कैलाससोबत विवाह झाला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ सुरू केला. नमिता वडिलांना याबाबत सांगत होत्या. मात्र, संसार तुटू नये म्हणून माहेरच्यांनी मध्यस्थी करून कैलासची समजूत घातली होती. प्लायवूड व लॅमिनेट व्यवसाय असलेल्या कैलासचे एका महिला कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधाबाबत नमिता यांनी विचारणा केल्यानंतर कैलास त्यांना मारहाण करत होता. १९ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता नमिता यांनी सासरच्यांच्या छळाची एक ऑडिओ क्लिप बहिणीला पाठवली होती. २० मार्च रोजी काैटुंबिक छळामुळे वकिलाचा सल्लादेखील घेतला होता. नमिता यांनी गुरुवारी आत्महत्येपूर्वी पहाटे ४ वाजता वडिलांच्या व्हॉट्सॲपवर तीन मेसेज पाठवले. मात्र, ते नंतर डिलिट झाले. त्याच्या दोन तासांनी नमिता यांच्या माहेरच्यांना त्यांच्या आत्महत्येबाबत कळाले.
काय म्हटलेय सुसाइड नोटमध्ये?
दोन पानांच्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी सासरच्यांच्या छळाविषयी लिहिले. घरातील वातावरणाला कंटाळले आहे. सर्वांनी माझा तमाशा करून ठेवला. या सर्व गोष्टींमुळे मुलांवर परिणाम होऊन तेदेखील मला रागावतात, उलटून बोलतात. याचा माझ्या मनावर आघात झाला आहे. माझी मुलगी माझ्या मुलाला सांभाळेल. हे लिहिताना माझे हात कापत आहेत, पण तरी हे पाऊल मी उचलत आहे, असे चिठ्ठीत नमूद आहे. उपनिरीक्षक मारोती खिल्लारे तपास करत आहेत.