'सर्वांना स्मशानभूमीत यावेच लागणार...' ; महापालिका आयुक्तांचा भावनिक सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:29 PM2020-01-23T12:29:37+5:302020-01-23T12:46:26+5:30
मी मोठा, लहान असा आविर्भाव न ठेवता चांगले काम करा
औरंगाबाद : महापालिका आयुक्तांसह नगरसेवक, अधिकारी, सफाई कर्मचारी...प्रत्येकाला एकदा शेवटी स्मशानभूमीत यावेच लागणार आहे. त्यामुळे मी मोठा, लहान असा आविर्भाव न ठेवता चांगले काम करा, असा भावनिक सल्ला बुधवारी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला.
बुधवारी सकाळी आयुक्तांनी सिंधी कॉलनी, बालाजीनगर, शिवशंकर कॉलनी, बौद्धनगर, क्रांतीचौक आदी भागांची पाहणी केली. त्यांच्या पाहणी दौऱ्याचा समारोप रमानगर येथे करण्यात आला. या ठिकाणी त्यांना स्मशानभूमी निदर्शनास आली. उपस्थित मोजक्याच अधिकाऱ्यांना त्यांनी स्मशानभूमीकडे बोट दाखवीत प्रत्येकाचा शेवट येथेच होणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून चांगले काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोंढा नाका येथून आयुक्तांनी सकाळी पाहणीला सुरुवात केली. उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलेले पेंटिंग त्यांना खूप आवडले. त्यानंतर सिंधी कॉलनीत दोन इमारतींचे बांधकाम सुरू होते; परंतु या इमारतींना संरक्षणासाठी जाळी (ग्रीन नेट) बसविण्यात आलेली नव्हती. बांधकाम साहित्यही रस्त्यावर पडले होते. आयुक्तांनी जागेवरच दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. बांधकाम मालक सुनील प्रताप यांच्यासह एकाला प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. आयुक्त पाण्डेय बालाजीनगरात पोहोचले. काही दुकानांसमोर ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी डस्टबीन ठेवण्यात आल्या होत्या. एका मिठाईच्या दुकानदाराकडे विचारणा केली असता तो म्हणाला माझ्याकडे ओला कचराच निघत नाही. त्यावर आयुक्तांनी या दुकानदारासह सर्व दुकानदारांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला.
बच्चा तुम मुझे समझाओगे और मैं...
क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या बाजूला श्रीकृष्ण विजय सॉ मिल येथे आयुक्त दाखल झाले. जागा मनपाने लीजवर दिल्याचे मालक तरुणाने सांगितले. मनपाची परवानगी, अग्निशमन एनओसीही त्याच्याकडे नव्हती. जागेचा न्यायालयीन वाद असल्याचेही आयुक्तांनी जाणून घेतले. यावेळी मालक आयुक्तांना जागेच्या मालकीबाबत सांगत होता. त्याला ‘बच्चा तुम मुझे समझाओगे और मैं मान जाऊंगा तो आयुक्त किस काम के...’ असे म्हणत आयुक्त पुढे निघाले.
रेड्डीच्या रिक्षामध्ये मिक्स कचरा
कचरा संकलनाचे काम करणाऱ्या बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीची रिक्षा आयुक्तांना निदर्शनास आली. रिक्षाची पाहणी केली तेव्हा मिक्स कचरा निदर्शनास आला.मिक्स कचरा पाहताच संताप व्यक्त करीत पर्यवेक्षकाला दंड करा, तसेच सर्वच रिक्षांची तपासणी करून पर्यवेक्षकांच्या पगारातून दंडाची रक्कम कपात करावी, कंपनीचे मालक रेड्डी यांना बोलावण्यात यावे, असे आदेश आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना दिले.