ओझोन थराच्या संरक्षणासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करावेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 05:12 AM2019-09-16T05:12:35+5:302019-09-16T05:12:43+5:30
१९९५ पासून ओझोन दिन साजरा केला जातो. या दिवसापासून आजपर्यंत वृक्षतोड, वाहनांची संख्या, उष्णता निर्माण करणारी उपकरणे यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे.
औरंगाबाद : १९९५ पासून ओझोन दिन साजरा केला जातो. या दिवसापासून आजपर्यंत वृक्षतोड, वाहनांची संख्या, उष्णता निर्माण करणारी उपकरणे यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. त्यामुळे ओझोन थराच्या संरक्षणासाठी केवळ एक दिवसाचे कौतुक करून उपयोग नाही. तर यासाठी प्रत्येकानेच प्रयत्नशील राहून कार्बन उत्सर्जित करणाऱ्या घटकांच्या वापरासंबंधी स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहन एपीजे अब्दुल कलाम संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले.
मानवी हस्तक्षेपामुळे काही वायूंचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्सर्जन यामुळे ओझोनच्या थराला छिद्र पडले असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाने १९८७ साली जाहीर केले. यानंतर १९९५ पासून १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो.
याविषयी अधिक सांगताना औंधकर म्हणाले की, या संघटनांच्या म्हणण्यानुसार ओझोनच्या थराला छिद्र पडले आणि आता त्याची रिकव्हरी म्हणजेच भरपाई होत असल्याचा या संघटनांचा दावा पूर्णपणे अविश्वसनीय वाटतो.
ज्या घटकांमुळे ओझोनच्या थरावर विपरीत परिणाम होतो, अशा वायूंचे प्रमाण १९८७ च्या तुलनेत आज निश्चितच वाढलेले आहे, त्यामुळे मग ओझोन रिकव्हरीविषयी या संस्थांचा दावा खरा कसा मानायचा, असा प्रश्न उपस्थित करून या सर्व गोष्टींवर संशोधनात्मक पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि दैनंदिन जीवनातून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत, असे औंधकर यांनी सुचविले.
>ओझोन थरासाठी मंदी फायद्याची
मंदीचा सर्वात मोठा फटका वाहन उद्योगाला बसला असून वाहन विक्री ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. ही गोष्ट ओझोन थर आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आनंददायी वाटते. कारण यानिमित्ताने का होईना पण रस्त्यावरील वाहनांची संख्या घटेल. यासोबतच इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने टीव्ही, ओव्हन, रेफ्रीजरेटर, वाहन या गोष्टींवर नियंत्रण ठेवावे.