भीमगीतांसह लेझीम, ढोल, हलगीच्या तालावर सारेच मंत्रमुग्ध; रमाई पहाट मैफिल पाच तास रंगली
By स. सो. खंडाळकर | Updated: February 7, 2025 19:21 IST2025-02-07T19:17:55+5:302025-02-07T19:21:35+5:30
अंजली गडपायले या अवघ्या १० वर्षीय बाल गायिकेवर बक्षिसांची बरसात; लेझीम, हलगी, धम्मनाद ढोल पथकाने व मल्लखांबच्या प्रात्यक्षिकाने डोळ्याचे पारणे फेडले

भीमगीतांसह लेझीम, ढोल, हलगीच्या तालावर सारेच मंत्रमुग्ध; रमाई पहाट मैफिल पाच तास रंगली
छत्रपती संभाजीनगर: ‘उमर में बाली, भोली बाली, शीलकी झोली हूं, भीमराज की बेटी, मैं तो जयभीमवाली हॅूं’या अंजली गडपायले या चिमुकलीने कॅनॉट प्लेसमध्ये रमाई पहाटमध्ये गायलेल्या गाण्याने धमाल उडवून दिली. उपस्थित आंबेडकरी रसिक- श्रोत्यांनी या गाण्यावर ठेका तर धरलाच. पण ज्या ताकदीने हे गाणे अंजलीने सादर केले, ते एवढे भावले की, वन्समोअरचा आग्रह वाढला. हे गाणे गात असतानाच अंजलीवर बक्षिसांची अक्षरश: बरसात होत होती. अंजली ही तेलंगणात असते. ती खास रमाई पहाटमध्ये गाण्यासाठी आली होती. ती अवघी दहा वर्षांची आहे.
गतवर्षापासून कुणाल वराळे, चेतन चोपडे, अजय देहाडे, सचिन भुईगळ, विजय पवार, अक्षय जाधव यांच्या पुढाकारातून रमाई पहाटचे आयोजन करण्यात येते. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. सम्राट अशोक युवा मंच, कैलासनगरच्या लेझीम पथकाने विविध प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी प्रेम थापा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत तर रोशनी तेजाब ही माता रमाईच्या भूमिकेत होती. धम्मनाद ढोलपथकाने परिसर दणाणून सोडला. हलगी पथकाने ठेका धरायला लावला. साई वाघमारे आणि संघाने मल्लखांबचे सादरीकरण केले. सिध्दार्थ खरात आणि संचाने नृत्य सादर केले. भन्ते करुणानंद बोधी महाथेरो व भिक्खू संघाने सामूहिक त्रिशरण पंचशील व सामूहिक बुध्द वंदना घेतली. प्रज्ञा वानखेडे व निकिता बंड यांनी गायलेल्या वंदन गीताने रमाई पहाटची सुरुवात झाली. नंतर निकिता बंड यांनी‘ साथ साहेबांची मला ही मिळाली, म्हणुनी जगाला रमाई कळाली’ हे गीत सादर केले.
चेतन चोपडे या गायकाने ‘ गुलमोहरी रुपाच्या भीमाला..साजनी गुलमोहरी मिळाली’ हे गीत सुंदर पध्दतीने सादर केले. विजय पवार यांचे ‘ जयभीम जयभीम शिकलो आईच्या कुशीत,भीमाच्या पुण्याईने रहा तू खुशीत’ हे गाणेही उपस्थितांना भावले.
अजय देहाडे या प्रख्यात गायकाने‘माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलें रमानं’ व ‘येणार बाई बॅरिस्टर साहेब माझा’ ही दोन गाणी गाऊन धमाल उडवून दिली. प्रवीण डाळींबकर या सिने कलावंताने डायलॉगबाजी करून टाळ्या मिळवल्या. प्रशांत मोरे यांच्या गीत गायनाने व कविता वाचनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. अविनाश भारती यांच्या प्रबोधनालाही दाद देण्यात आली. संजय बनसोडे यांनी आगामी चित्रपटाची माहिती दिली. सचिन भुईगळ यांनी ‘माझा भीम मले भेटतो बाई...मले सांगतो काही’ हे गीत गाऊन संभाजी भगत यांची आठवण करुन दिली. बोधी चोपडे हिने ‘बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत’ हे गीत सादर केले. सद्दाम शेख यांनी संचालन केले. रॅपर सुबोध जाधव, प्रज्योत उघाडे व शाहिद शेख यांच्या गाण्यावर तरुणाई थिरकली.