घाटी है तो मुमकिन है! १५५ किलो वजनाच्या महिलेचे सिझेरियन ऑपरेशन यशस्वी, जगातील ७ वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 03:45 PM2022-02-03T15:45:45+5:302022-02-03T15:48:30+5:30
६६ बीएमआय असलेल्या व्यक्तीवर जगात आजपर्यंत केवळ ६ वेळाच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सातवी शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात पार पाडली.
- संतोष हिरेमठ/सुमेध उघडे
औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय अर्थात घाटी रुग्णालय मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. येथील स्त्री व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली २४ जानेवारीस तब्बल १५५ किलो वजन असलेल्या एका गर्भवती महिलेवरील अत्यंत गुंतागुंतीची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. माता आणि बाळ थांथानीत असून सुखरूप आहेत. विशेष म्हणजे, ६६ बीएमआय असलेल्या व्यक्तीवर जगात आजपर्यंत केवळ ६ वेळाच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सातवी शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात पार पाडली. या यशाबद्दल संपूर्ण वैद्यकीय टीमचे कौतुक होत आहे.
घाटी रुग्णालयात एक गर्भवती महिला काही दिवसांपूर्वी महिला पथक प्रमुख डॉ. विजय कल्याणकर यांच्या पथक क्र. ३ मध्ये दाखल होऊन उपचारासाठी दाखल झाली. तिचे वजन १५५ किलो असून उच्च रक्तदाब, मधुमेह आणि पोटाचा विकार होता. यासोबतच पहिली प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रियेने झाली होती. शिवाय जगात आजवर ६६ बीएमआय असलेल्या केवळ ६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे ही प्रसूती घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना हे एक आव्हानच होते. एका महिन्या पूर्वीच शस्त्रक्रियेची विशेष तयारी करण्यात आली. विशेष उपकरणे, दोन ट्रॉलीज, दोन ऑपरेशन टेबल आदींची उपलब्धता करण्यात आली. २४ जानेवारीस तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
ही शस्त्रक्रिया डॉ. श्रीनिवास एन. गडप्पा यांनी केली, त्यांना डॉ. विजय वाय. कल्याचकर, डॉ. सोनाली एस. देशपांडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रुपाली गायकवाड यांनी मदत केली. तसेच डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. सुचिता जोशी, डॉ. प्रशांत पाचोरे व डॉ. सय्यद अनिसा या भूलतज्ज्ञांनी मदत केली. तसेच दोन्ही विभागातील निवासी डॉक्टर डॉ. अमिता अकडे, डॉ. प्रतिक्षा चंदळकर, डॉ. बेताली पोडन डॉ. ऐश्वर्या एम. डॉ. हर्पीता एस. डॉ. दिती आनंद, डॉ. अपूर्वा चाटोकर, डॉ. धनश्री पाटील डॉ. ऐश्वर्या वाडे) सिस्टर्स (सुनिता अस्वले, रंजना घुगे, तृप्ती पाडळे, रिबेका खंडागळे, चंद्रकला चव्हाण, विद्या निकुंभ ) , दिपक शिराळे यांनी सहकार्य केले.