औरंगाबादेत उमेदवार संख्या वाढल्यामुळे विदर्भातून मागविल्या ईव्हीएम
By विकास राऊत | Published: May 9, 2024 05:09 PM2024-05-09T17:09:49+5:302024-05-09T17:14:02+5:30
प्रशासनावर ताण : एकच ईव्हीएम लागेल, या दिशेने केली होती तयारी
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर ३ बॅलेट युनिट लागणार आहेत. मतदारसंघात २ हजार ४० मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रावर ३ ईव्हीएमचा विचार केला तर ६ हजार ४२० मशीन लागणार आहेत. प्रशासनाने एक ईव्हीएम लागेल, असे गृहीत धरले आहे.
४ हजार ८९८ ईव्हीएम चंद्रपूरमधून मागविण्यात आल्या आहेत. त्या ईव्हीएमची प्राथमिक तपासणी करण्यासाठी १२ अभियंते कामाला लागले आहेत. उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे प्रशासकीय ताण वाढला आहे. ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावतील. १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उमेदवार जास्त असल्यामुळे ३८ वेळा बॅलेट युनिटचा बझर वाजेल. फेऱ्यांची संख्या वाढेल. मॉकपोल ३८ वेळा करावे लागेल.
मतपत्रिका स्ट्राँगरूममध्ये
२९ रोजी सायंकाळी सात वाजेनंतर बॅलेट पेपरच्या छपाईला सुरुवात केली. लष्करातील सैनिकांसह हर्सूल कारागृहातील आरोपी, घरून मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बॅलेट पेपरद्वारे मतदान घेतले जाणार आहे. त्या मतपत्रिका वितरित झाल्या आहेत. ईव्हीएममध्ये लावण्यात येणाऱ्या मतपत्रिका छपाई करून स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत.
जास्तीच्या ईव्हीएम कुठे लागणार
कन्नड : ८६२
औरंगाबाद मध्य : ७५८
औरंगाबाद पश्चिम : ८०९
औरंगाबाद पूर्व : ८३२
गंगापूर : ८३५
वैजापूर : ८११
एकूण : ४८९८