माजी नगराध्यक्षांसह सहा जणांना केले हद्दपार...
By Admin | Published: April 29, 2017 12:45 AM2017-04-29T00:45:34+5:302017-04-29T00:47:21+5:30
उस्मानाबाद : विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले माजी नगराध्यक्ष अमित दिलीप शिंदे यांच्यासह सहा जणांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी काढले़
उस्मानाबाद : विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले माजी नगराध्यक्ष अमित दिलीप शिंदे यांच्यासह सहा जणांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी काढले़ यात दोघांना तब्बल दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे़ तर इतरांना तीन ते सहा महिन्यांसाठी जिल्हा व परिसरातील तीन तालुक्यांमधून हद्दपार केले आहे़
उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांसह इतर अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपितांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येतात़ सन २०१४ पासून उस्मानाबाद येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात दाखल असलेले ४५ प्रस्ताव प्रलंबीत होते़ उपविभागीय दंडाधिकारी म्हणून पदभार हाती घेतल्यानंतर परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस अधीक्षकांसमवेत बैठक घेतली होती़ या बैठकीत प्रस्तावित तडीपारीचे प्रस्ताव निकाली काढण्याबाबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या़ प्रस्तावांवरील सुनावणीसाठी संबंधितांना नोटीसा देऊन बोलाविण्यात आले होते़ या सुनावणीदरम्यान उस्मानाबाद शहराचे माजी नगराध्यक्ष अमित दिलीप शिंदे यांना उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़मागील काही वर्षात भिमनगर व सांजा रोड भागातील युवकांमध्ये सतत हाणारी होऊन शहराचे वातावरण बिघडाविले जात होते़ या दोन्ही टोळींमधील प्रमुखांसह इतर काहींचे हद्दपारीचे प्रस्तावही दाखल होते़ यातील सांजा रोड टोळीतील प्रमुखाला यापूर्वीच हद्दपार करण्यात आले आहे़ तर शुक्रवारी काढलेल्या आदेशात भिमनगर मधील लल्या उर्फ सुशांत बनसोडे, व भैय्यासाहेब नागटिळे या दोघांना उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारील बीड, लातूर, सोलापूर आदी जिल्ह्यांमधून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़ याशिवाय सांजारोड टोळीतील सचिन नामदेव राठोड याला सहा महिन्यांसाठी, भिमनगर मधील बाळासाहेब अंगुल बनसोडे याला सहा महिन्यांसाठी उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील तालुक्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे़ तर शहरातीलच प्रकाश छगन पवार याला तीन महिन्यासाठी उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील तालुक्यांमधून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आल्याचे सांगून उर्वरित प्रकरणेही लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली़(प्रतिनिधी)