माजी आमदाराच्या पतीला कारावास, हायकोर्टाकडून सहा दोषींची १० वर्षांची शिक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 04:44 AM2017-11-22T04:44:23+5:302017-11-22T04:44:34+5:30
परभणीमध्ये १९९४ साली झालेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणी पाथरीच्या माजी आमदारांच्या पतीसह सहा दोषींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी सत्र न्यायालयाच्या प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली.
औरंगाबाद/परभणी : परभणीमध्ये १९९४ साली झालेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणी पाथरीच्या माजी आमदारांच्या पतीसह सहा दोषींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी सत्र न्यायालयाच्या प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली. चार दोषींचा मृत्यू झालेला आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी हा निकाल दिला.
परभणी येथे १९९४ साली तीन दिवसांत सोळा आरोपींनी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. उच्च न्यायालयाने दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याबाबतचे शासनाचे अपील रद्द केले. सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरुद्ध दोषींनी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते, तर दोषींच्या शिक्षेत वाढ व्हावी, यासाठी शासनाने सुद्धा खंडपीठात अपील दाखल केले होते. अपिलांवर सुनावणी झाली.
>पाथरीत शिवसेनेला धक्का
कल्याण रेंगे हे शिवसेनेच्या पाथरी विधानसभा मतदार संघाच्या माजी आ़ मीराताई रेंगे यांचे पती आहेत़ मीराताई या २००९ ते २०१४ मध्ये आमदार होत्या. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला़ २०१९ च्या निवडणुकीसाठीही मीराताई यांनी शिवसेनेकडून तयारी सुरू केली आहे़
दोषी कोण? : अपील प्रलंबित असताना आरोपींपैकी सूर्यकांत ढगे, अरुण मापारी, सुरेश कोपटे आणि नितीन दुधगावकर यांचे निधन झाले. उर्वरित कल्याण रेंगे, रामेश्वर कानडे, रेल्वे कर्मचारी भानसिंग बुंदेले, तत्कालीन नगरसेवक मुन्ना परिहार, राजू महालगे आणि महेश मोताफळे यांची शिक्षा खंडीपठाने कायम केली.शिक्षा झालेल्यांमध्ये शिवसेना नेते कल्याण रेंगे यांचा समावेश आहे. ते पाथरीच्या माजी आमदार मीराताई रेंगे यांचे पती आहेत. कामाच्या शोधार्थ आलेल्या मुलींवर अत्याचार झाले होते.