हॉलतिकीट नव्हे 'पीआरएन' नंबरवर दिली परीक्षा; कुलगुरूंनी ठोठावला केंद्राला एक लाखांचा दंड
By राम शिनगारे | Published: April 25, 2024 03:31 PM2024-04-25T15:31:56+5:302024-04-25T15:32:36+5:30
विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर अनेक महाविद्यालयांमध्ये ऐनवेळी पीआरएन नंबरवर परीक्षा देण्याचा प्रघातच मागील काही वर्षात पडला होता.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या परीक्षा फक्त हॉलतिकीटच्या नंबरवरच घेण्यात येतील. कोणत्याही विद्यार्थ्यांची परीक्षा कायमस्वरूपी नोंदणी क्रमांकावर (पीआरएन) घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्याविषयीचे आदेशही संलग्न महाविद्यालयांना देण्यात आले होते. एवढे करून एका महाविद्यालयाने तीन विद्यार्थ्यांची परीक्षा पीआरएन नंबरच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी संबंधित परीक्षा केंद्रास एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.
विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर अनेक महाविद्यालयांमध्ये ऐनवेळी पीआरएन नंबरवर परीक्षा देण्याचा प्रघातच मागील काही वर्षात पडला होता. पीआरएन नंबरवर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अगदी शेवटच्या दिवशी परीक्षा अर्ज भरलेला असतो. त्यामुळे परीक्षा विभागाला या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे यावर्षीपासून पीआरएन नंबर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा देता येणार नसल्याचे परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. याविषयीचे आदेशही प्राचार्यांना पाठविण्यात आले होते. एवढे झाल्यानंतरही शेंद्रा भागातील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने विद्यापीठाची परवानगी न घेताच पीआरएन नंबरवर तीन विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आहे. याविषयीची माहिती उघड होताच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी संबंधित परीक्षा केंद्रास एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.
बेशिस्तीच्या घटनांची मालिका सुरूच
विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यापासून परीक्षा केंद्र बदलने, परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. आता तर थेट विद्यापीठाची परवानगी न घेताच पीआरएन नंबरवरच एका केंद्राने परीक्षा घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परीक्षेतील बेशिस्त वागण्याच्या घटनांची मालकीच सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.