भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांची सत्व परीक्षा; ३० उद्यानांचा कायापालट करण्यासाठी ७१ कोटी द्या!
By मुजीब देवणीकर | Published: January 3, 2024 06:49 PM2024-01-03T18:49:53+5:302024-01-03T18:50:00+5:30
नगरविकास विभागाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत निधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : महापालिका हद्दीत लहान- मोठे जवळपास १०० पेक्षा अधिक उद्याने आहेत. कर्मचारी, निधीअभावी या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. त्यातील ३० उद्यानांचा विकास करण्यासाठी महापालिकेने ७१ कोटींचा प्रस्ताव तयार केला. नगरविकास विभागाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत निधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. भाजपा, शिंदे गटाचे आमदार किती दिवसांत हा प्रस्ताव मंजूर करून आणतात, याकडे शहराचे लक्ष लागलेले राहील.
म्हणे शहराला निधी कमी पडू देणार नाही
सिडको एन-८ येथील नेहरू उद्यानात नौकाविहारचे लोकार्पण सोमवारी भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांनी विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. अलीकडेच डीपी रस्त्यांच्या विकासासाठी मनपाने १ हजार कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला. आता ७१ कोटींचा प्रस्ताव दिला आहे.
मनपाच्या प्रस्तावात या उद्यानांचा समावेश
उद्यानाचे नाव ------------------अपेक्षित खर्च
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यान येथे तारांगण विकासित करणे- २ कोटी
-पडेगाव परिसर मंजूर रेखांकनात नियोजित उद्याने- ५ कोटी
-हर्सूल परिसर मंजूर रेखांकनात नियोजित उद्याने- ५ कोटी
-मिटमिटा येथील गट नंबर १५५ व १५६ मंजूर रेखांकनात उद्याने- ५ कोटी
-स्मृतिवन उद्यान, हर्सूल- २ कोटी
-सावंगी तलाव उद्यान- १ कोटी
-हिमायतबाग खुल्या जागेत उद्यान- २ कोटी
-ऑडिटर सोसायटी उद्यान- ५० लाख
-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान एन-११ सिडको-५० लाख
-सिडको एन-१२ रेखांकनातील हरितपट्टा विकसित करणे- ५ कोटी
-बटरफ्लाय उद्यान एन-११ सिडको-१ कोटी
-बाबा गार्डन, एन-६ सिडको-१ कोटी
-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल उद्यान सिडको एन-८ - ३ कोटी
-सोरमबाई मलके उद्यान, नारेगाव- ५० लाख
-केटली उद्यान, सिडको एन-३- १ कोटी
-समई गार्डन सिडको एन-३- १ कोटी
-दर्पण उद्यान सिडको एन-३- १ कोटी
-डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान सिडको एन-१ -१ कोटी
-शास्त्रीनगर उद्यान- १ कोटी
-गारखेडा गट नंबर २० येथे उद्यान- १ कोटी
-परिमल हाउसिंग सोसायटी उद्यान- ५० लाख
-अलंकार हाउसिंग सोसायटी उद्यान- ५० लाख
-नंदीग्राम हाउसिंग सोसायटी उद्यान- ५० लाख
-सातारा परिसर मंजूर रेखांकनातील उद्याने- ५ कोटी
-सहकारनगर उद्यान- १ कोटी
-संजय हाउसिंग सोसायटी उद्यान- १ कोटी
-कवितेची बाग उद्यान, ज्योतीनगर- १ कोटी
-शिवाजीनगर परिसरातील उद्याने- २ कोटी
-शहरातील पाच प्रमुख उद्याने साहसी खेळ उद्यान विकसित करणे- १० कोटी
-शहरातील विविध ठिकाणी थीम पार्क उभारणी करणे- १० कोटी