सहकेंद्रप्रमुखांविनाच बीडमध्ये परीक्षा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:01 AM2017-11-16T00:01:53+5:302017-11-16T00:02:03+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांवर नियुक्त केलेले विद्यापीठ प्रतिनिधी तथा सहकेंद्रप्रमुखच रूजू झाले नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी समोर आली आहे. यामुळे महाविद्यालयातील एखाद्या गैरप्रकारास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बीड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांवर नियुक्त केलेले विद्यापीठ प्रतिनिधी तथा सहकेंद्रप्रमुखच रूजू झाले नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी समोर आली आहे. यामुळे महाविद्यालयातील एखाद्या गैरप्रकारास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाकडे मागणी करूनही अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.
विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत बीड जिल्ह्यात पहिल्या दिवशीपासूनच गोंधळ सुरू आहे. अचानक केंद्र बदलने, परीक्षेत खुलेआम कॉपी चालणे यासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यात त्यांना अपयश येत आहे. बुधवारी काही महाविद्यालयांना भेटी दिल्या असता विद्यापीठाने नियूक्त केलेले सहकेंद्रप्रमुखच रूजू झाले नसल्याचे समोर आले. त्यामुळे परीक्षा केंद्रात प्राचार्यांनाच लक्ष घालावे लागत आहे. तसेच कार्यालयीन कामकाज करण्याबरोबरच परीक्षा केंद्रातील गैरप्रकारांवर आळा घालणे त्यांच्यासाठी जिखरीचे बनत आहे. हीच संधी साधून पर्यवेक्षक, सेवक विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यात मदत करत असल्याचे दिसून येते.
दरम्यान, सहकेंद्रप्रमुख देण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावाही केला. परंतु त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नसल्याचे एका प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सहकेंद्रप्रमुख नसल्याने आपल्याला विद्यार्थ्यांची तपासणी, कार्यालयीन कामकाज व परीक्षा केंद्रातील गैरप्रकारांवर लक्ष ठेवणे अडचणीचे ठरत आहे, असेही प्राचार्य म्हणाले.
कॉपीमुक्तीसाठी विद्यापीठाचे १६ पथक
बीडमधील सर्व केंद्रांवर सहकेंद्रप्रमुखांची नियुक्ती केलेली आहे. परंतु काही लोक रूजू झालेले नसतील. त्यांचा आढावा घेत आहोत. लवकरच यावर कारवाई करू. तसेच कॉपीमुक्तीसाठी विद्यापीठाचे १६ पथक नियूक्त केलेले आहेत. त्यांचाही आढावा घेत आहोत.
- डॉ. बी. एम. नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ.बा.आं.म.विद्यापीठ, औरंगाबाद