परीक्षा संचालकांनी दिला राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:39 AM2017-10-28T00:39:28+5:302017-10-28T00:39:31+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी शुक्रवारी सायंकाळी कर्मचा-यांमार्फत पदाचा राजीनामा कुलगुरूंकडे सुपूर्द केला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी शुक्रवारी सायंकाळी कर्मचा-यांमार्फत पदाचा राजीनामा कुलगुरूंकडे सुपूर्द केला. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात दिले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी हा राजीनामा रात्री उशिरापर्यंत स्वीकारला नव्हता. मात्र डॉ. दांडगे शनिवारपासून कामकाज पाहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी परीक्षा विभागातील एका अधिकाºयाच्या मनमानीपणाला कंटाळून कुलगुरूंकडे गुरुवारी सकाळी अडचणी मांडल्या होत्या.
या अडचणी सोडविल्याशिवाय कामकाज पाहणार नाही, असेही स्पष्ट केले. याविषयी निर्णय घेण्यासाठी कुलगुरूंना एक दिवसाचा अवधी दिला होता. यासाठी शुक्रवारी दिवसभर वाट पाहिली. मात्र कुलगुरूंनी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान कर्मचा-यांमार्फत डॉ. दांडगे यांनी राजीनाम्याचे पत्र कुलगुरूंकडे सुपूर्द केले. तेव्हा खडबडून जागे झालेल्या कुलगुरूंनी डॉ. दांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर कुलगुरूंनी संबंधित अधिका-याला कार्यालयात बोलावले होते. तेव्हा दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र काहीही तोडगा निघाला नसल्याचे समजते. याविषयी डॉ. दांडगे, कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
परीक्षा संचालक डॉ. दांडगे यांनी राजीनामापत्रात वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.