व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याची अरेरावी;दीक्षांत सोहळ्यापूर्वीच परीक्षा संचालकांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:12 IST2025-01-24T14:11:37+5:302025-01-24T14:12:28+5:30

कुलगुरूंच्या दालनात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याकडून परीक्षा संचालकांसोबत अरेरावीचे वर्तन

Examination Director resigns before convocation ceremony; Management Council member behaves rudely in Vice Chancellor's office | व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याची अरेरावी;दीक्षांत सोहळ्यापूर्वीच परीक्षा संचालकांचा राजीनामा

व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याची अरेरावी;दीक्षांत सोहळ्यापूर्वीच परीक्षा संचालकांचा राजीनामा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असतानाच परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर कुलगुरूंच्या दालनात एका सदस्याने त्यांच्यासोबत अरेरावीचे वर्तन केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. तसेच कुलसचिव कार्यालयाकडून परीक्षा विभागासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करताच मनमानी पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असल्यामुळे काम करणे कठीण झाल्याचेही त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. या बैठकीनंतर कुलगुरूंच्या दालनामध्ये संवैधानिक अधिकारी चर्चा करीत होते. तेव्हा परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या कोणतीही चर्चा न करताच केल्या जात असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी एक लॅब असिस्टंट असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीची माहिती दिली. तेव्हा संबंधित कर्मचाऱ्याची बाजू घेत व्यवस्थापन परिषद सदस्याने परीक्षा संचालकांसोबत मोठमोठ्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली. कुलगुरूंच्या दालनात अशा पद्धतीची अपमानास्पद वागणूक संचालकांना सहन झाली नाही. त्यांनीही संबंधित सदस्यास नियमानुसार सुनावल्याचे समजते. या घटना घडत असताना उपस्थित संवैधानिक अधिकाऱ्यांनी त्यात हस्तक्षेप न करता बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे परीक्षा संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. याविषयी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

२२ फेब्रुवारी रोजी दीक्षांत सोहळा
विद्यापीठाच्या २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ६५ व्या दीक्षांत साेहळ्याला उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे परीक्षा विभागाकडून सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच परीक्षा संचालकांच्या राजीनाम्यामुळे त्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडून राजीनामा फेटाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यापूर्वी एका संचालकाचा राजीनामा
काही महिन्यांपूर्वी प्र-कुलगुरूंच्या दालनात व्यवस्थापन परिषद सदस्याच्या गैरवर्तनामुळे राजीनामा देत असल्याचे आजीवन व शिक्षण विस्तार विभागाच्या प्रभारी संचालकांनी राजीनामा पत्रात म्हटले होते. त्यानंतर आता परीक्षा संचालकास कुलगुरूंच्या दालनात व्यवस्थापन परिषद सदस्याच्या अरेरावीच्या वर्तनामुळे राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न
परीक्षा संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. कुलगुरूंच्या दालनामध्ये व्यवस्थापन परिषद सदस्याचे अधिकाऱ्यासोबतचे वर्तन योग्य नव्हते. त्याशिवाय परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना विभागप्रमुखांशी कोणतीही चर्चा न करता बदलण्यात येत आहे. त्यातून अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याठिकाणी काम करणे शक्य नसल्यामुळे राजीनामा दिला आहे.
- डॉ. भारती गवळी, परीक्षा संचालक, विद्यापीठ

Web Title: Examination Director resigns before convocation ceremony; Management Council member behaves rudely in Vice Chancellor's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.