परीक्षा संचालक राजीनाम्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:47 AM2017-10-27T00:47:00+5:302017-10-27T00:47:19+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

 Examination Director will give resignation | परीक्षा संचालक राजीनाम्याच्या तयारीत

परीक्षा संचालक राजीनाम्याच्या तयारीत

googlenewsNext

राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. परीक्षा विभागातील एक अधिकारी आणि कर्मचाºयाच्या मनमानी पद्धतीच्या कामामुळे कंटाळलेल्या संचालकांनी सर्व कैफियत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे मांडली. कुलगुरूंनी यावर कोणताही निर्णय न घेतल्यास संचालक शुक्रवारी राजीनामा देणार असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विद्यापीठात कुलसचिव, परीक्षा संचालक, वित्त व लेखाधिका-यासह इतर सर्व संवैधानिक अधिकारी पूर्णवेळ भरलेले नाहीत. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळापासून हे प्रभारीराज कायम आहे. कुलगुरूंच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात डॉ. सतीश दांडगे हे तब्बल सातवे परीक्षा संचालक आहेत. साई अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेच्या कार्यकाळात तत्कालीन परीक्षा संचालकांना बदलण्यात आले. त्यानंतर संचालकपदाची धुरा सांभाळलेल्या डॉ. राजेश रगडे यांनी सर्व अभ्यासक्रमांचे निकाल लावण्याचे आव्हान पेलले. निकाल लागताच त्यांनी २ सप्टेंबर रोजी राजीनामा कुलगुरूंकडे सुपूर्द केला. यानंतर परीक्षा संचालक होण्यास कोणीही राजी नसताना लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. दांडगे यांच्याकडे ५ सप्टेंबर रोजी पदभार सोपविण्यात आला. यानंतर अवघ्या दीड महिन्यातच डॉ. दांडगे संचालकपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत
आहेत.
पदव्युत्तर प्रवेशाला झालेल्या विलंबामुळे दोन वेळा शैक्षणिक कॅलेंडर बदलावे लागल्यामुळे परीक्षा तब्बल महिनाभर उशिराने सुरू होणार आहेत. याचा परिणाम पुढील वर्षातील प्रवेश प्रक्रियेवर होईल. यासाठी योग्य नियोजनाची गरज असतानाच डॉ. रगडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर डॉ. दांडगे यांनी याविषयी नियोजन केले असतानाच एक अधिकारी आणि कर्मचा-याच्या मनमानी पद्धतीमुळे परीक्षा विभागातील सर्व कर्मचारी हतबल झाले आहेत.
संबंधित अधिका-याने संचालकांची परवानगी न घेताच सर्व कर्मचाºयांना पत्र दिले आहेत. याविषयी कर्मचाºयांनी डॉ. दांडगे यांच्याकडे तक्रारी मांडल्या. मात्र लेखी तक्रार देण्यास कोणीही समोर येत नाही.
डॉ. दांडगे यांनी हा सर्व प्रकार कुलगुरू डॉ. चोपडे यांची भेट घेऊन मांडला. यावर संबंधित कर्मचा-यांची बदली करण्यात यावी, अन्यथा माझाच राजीनामा स्वीकारावा, अशी मागणी संचालकांनी कुलगुरूंकडे केल्याचे समजते. यासाठी कुलगुरूंना एक दिवसाचा वेळ दिला असून, शुक्रवारी कोणताही निर्णय न झाल्यास डॉ. दांडगे राजीनामा देणार असल्याचे प्रशासकीय इमारतीमधील सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Examination Director will give resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.