पहिल्या पेपरलाच विद्यापीठ नापास, विद्यार्थ्यांना सापडेना नियोजित केंद्रावर परीक्षा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:47 AM2017-11-10T11:47:13+5:302017-11-10T12:11:08+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना आजपासून सुरुवात झाली . मात्र, सकाळीच परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आपले परीक्षा क्रमांकच नमूद केलेल्या केंद्रावर सापडत नव्हते.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना आजपासून सुरुवात झाली . मात्र, सकाळीच परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आपले परीक्षा क्रमांकच नमूद केलेल्या केंद्रावर सापडत नव्हते. या आधीच ऐनवेळी २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आले होते व आता नियोजित केंदारवर परीक्षा क्रमांकच सापडत नसल्याने पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नियोजनाचा सावळा गोंधळ पुढे आला आहे.
शहरातील व विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वच जिल्ह्यात परीक्षा विभागाचे अपुरे नियोजन पदवी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला पुढे आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा नियोजनाच्या गोंधळाचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे. सकाळीच अभ्यास करून परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रावर आपला क्रमांक सापडत नव्हता. परीक्षेची वेळ जवळ येत असताना क्रमांक सापडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
या परीक्षेला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तब्बल ३ लाख ५ हजार ४९४ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेचा शुभारंभ ढिसाळ नियोजनाने झाला. परीक्षा केंद्रांचे योग्य नियोजन झाले नसल्यामुळे ऐनवेळी २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आली होती. विद्यापीठ परीक्षेसाठी किमान दोन महिन्यांपासून नियोजन करण्याची आवश्यकता असते. मात्र परीक्षा संचालकांच्या राजीनाम्यामुळे योग्य पद्धतीने परीक्षा केंद्रांचे वाटप करण्यात आले नाही. चार दिवसांपूर्वी परीक्षा संचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर परीक्षाा केंद्रांचा आढावा घेताना ज्या महाविद्यालयामध्ये परीक्षार्थी बसण्यासही जागा उपलब्ध नाही. अशा महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त विद्यार्थी देण्यात आले होते. तर ज्याठिकाणी सर्व सुविधा आहेत. त्या ठिकाणी अल्प प्रमाणात विद्यार्थी देण्यात आले. याचा परीणाम ऐनवेळी परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करावी लागली होती. यामुळे तब्बल २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आली होती.
२२४ केंद्रांवर सुरु आहे परीक्षा
विद्यापीठाच्या पदवी परीक्षा तब्बल २२४ केंद्रांवर सुरु आहे. यात औरंगाबद शहरात ३२, औरंगाबाद ग्रामीणमध्ये ४८, जालना शहर १२, जालना ग्रामीण ३४, बीड शहर १०, बीड ग्रामीण ५१, उस्मानाबाद शहर ९ आणि उस्मानाबाद ग्रामीणमध्ये २८ परीक्षा केंद्र असणार आहेत. या परीक्षात कॉपीमुक्तसाठी १६ भरारी पथके, २२४ सहकेंद्र प्रमख नेमण्यात आले आहेत.
अशी आहे परीक्षार्थींची संख्या
अभ्यासक्रम विद्यार्थी
बी.ए. १,०९,०६१
बी.एस्सी १,०८,३१६
बी. कॉम. ५८,३३५
बीसीएसव इतर २९,७८२
--------------------------
एकुण ३,०५,४९४