विधानसभेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा; विद्यापीठाला दिवाळीच्या सुट्या २६ ऑक्टोबरपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 05:32 PM2024-10-21T17:32:19+5:302024-10-21T17:32:34+5:30
विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व धाराशिव उप परिसरास २६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान सुट्या राहतील.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांना येत्या २६ ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक एप्रिलमध्येच जाहीर केले हाेते. त्यानुसार १५ जून ते २५ ऑक्टोबर या काळात प्रथम सत्र असणार आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व धाराशिव उप परिसरास २६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान सुट्या राहतील. हे विभाग ११ नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून, १ मे पर्यंत द्वितीय सत्र असणार आहे. तर संलग्नित महाविद्यालयांच्या २६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान दिवाळी सुट्या असणार आहेत, तर १६ नोव्हेंबर ते १ मे २०२५ या काळात द्वितीय सत्र असणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर परीक्षा
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षाही दिवाळीनंतर तसेच विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहेत. पूर्वी या परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी सुरू होणार होत्या. मात्र, आता परीक्षा निवडणूक निकालानंतर होणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. यामध्ये सर्व परंपरागत अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा डिसेंबर महिन्यात सुरू होतील, अशी माहिती परीक्षा विभागातील समन्वयक भगवान फड यांनी दिली.