कोरोनामुक्तांची क्षयरोग निदानासाठी थुंकी नमुने तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:16 PM2020-11-25T13:16:02+5:302020-11-25T13:18:44+5:30
कोरोना मुक्तांचे क्षयरोगाच्या तपासणीसाठी थुंकी नमुने घेण्याच्या सूचना आरोग्य संचालकांकडून मिळाल्या आहेत.
औरंगाबाद : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे क्षयरोग तपासणीसाठी थुंकीचे नमुने घेणे सध्या सुरू असून, क्षयरोगाची शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे. आरोग्य संचालकांनी कोरोनाबाधितांच्या थुंकीचे नमुने तपासणीच्या सूचना जिल्ह्यातील आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
जिल्ह्यात सर्दी, खोकल्याने बाधित किंवा बाधित होऊन गेलेल्या रुग्णांना क्षयरोगाची लागण झाली आहे का. याची खातरजमा करण्यासाठी कोरोना मुक्त रुग्णांच्या थुंकीचे एक हजाराहून अधिक नमुने जमा करण्याचे काम क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आले, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. उल्हास गंडाळ यांनी दिली. एचआयव्ही रुग्णांना विशेष काळजी घेण्याची सूचना एआरटी सेंटरमधून देण्यात येत असल्याचे डाॅ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. दरम्यान, क्षयरोगाचे उपचार घेणाऱ्या १२४८ जणांची एचआयव्ही तपासणी केली. एकूण ९८.४९ टक्के रुग्णांची तपासणी झाली. यात २७ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले
तालुकनिहाय नियोजन
माझे कुटुंब माझी जबाबदारीतून सहविकृती असल्याच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यापैकी ज्यांना लक्षणे आहेत फक्त त्यांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, सहविकृती असलेल्या नागरिकांना विषेश काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना मुक्तांचे क्षयरोगाच्या तपासणीसाठी थुंकी नमुने घेण्याच्या सूचना आरोग्य संचालकांकडून मिळाल्या आहेत. त्यानुसार नमुने जमा करण्यासाठी तालुकानिहाय व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयानुसार नियोजन करण्यात आले आहे, असे डाॅ. लाळे यांनी सांगितले.
एचआयव्ही रुग्णांची क्षयरोगाची तपासणी करण्याची आणि क्षयरोगाच्या रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्याचा जुनाच कार्यक्रम आहे. कोरोनामुळे राष्ट्रीय कार्यक्रमांची कामे प्रभावित झाली आहे. आता थोडी उसंत मिळाल्याने लसीकरण, कुटुंब नियोजनासारख्या कार्यक्रमांकडे लक्ष देऊन त्यांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आरोग्य विभागाचा प्रयत्न असेल. -डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक, परिमंडळ औरंगाबाद