कोठा कोळीत ८५ कुटुंबांची तपासणी
By Admin | Published: May 7, 2017 12:15 AM2017-05-07T00:15:57+5:302017-05-07T00:17:50+5:30
भोकरदन : तालुक्यातील कोठा कोळी येथे स्वाईन फ्लूचा रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्या विभागात मोठी खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील कोठा कोळी येथे स्वाईन फ्लूचा रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्या विभागात मोठी खळबळ उडाली. दोन दिवसांपासून या गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे. आतापर्यंत ८५ कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी केली. स्वाईन फ्लू सारख्या आजाराची काही लक्षणे आहेत काय, याची तपासणी केली.
कोठा कोळी येथील एका ६० वर्षीय रूग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कोठाकोळी गावात खळबळ उडाली होती. घाटी रूग्णालयात हा अहवाल ४ मे रोजी आल्यानंतर ५ मे रोजी जळगाव सपकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरजकुमार वाकोडे, सतीश निकम, आरोग्य सेवक माधव हिरेकर, परिचारिका शांताबाई झिल्पे यांनी कोठाकोळी गावात जाऊन ज्या रूग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्याच्या घरातील सर्वाना रूग्णवाहिकेतून जालना येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. त्याची तपासणी केली आहे. या रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झालेली नाही. तरी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून पाच जणांना जालना येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोठा कोळी गावातील ६५ ते ७० जणाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४ ते ५ जणांना सर्दी व ताप असल्याचे आढळून आले. त्यांना तात्काळ औषधी देण्यात आली आहेत असे डॉ. वाकोडे यांनी सांगितले आहे़