खिडकीबाहेर उभे करून हात न लावता रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:02 AM2021-09-10T04:02:17+5:302021-09-10T04:02:17+5:30
देवगाव रंगारी : येथील आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर त्यांना खिडकीबाहेर उभे करून आतूनच डॉक्टर हात न लावता तपासत ...
देवगाव रंगारी : येथील आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर त्यांना खिडकीबाहेर उभे करून आतूनच डॉक्टर हात न लावता तपासत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ विचारपूस करून औषध लिहून देत असल्याने येथील डॉक्टरांना रुग्णांची ॲलर्जी असल्याचे बोलले जात आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालये, महागडी औषधी परवडत नसल्याने हातावरचे पोट असलेले गरीब लोक सरकारी रुग्णालयांना देवालय व डॉक्टरांना देव मानतात. दहा रुपयांच्या केसपेपरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करीत असल्याने ते डॉक्टरांकडे मोठ्या आशाळभूत नजरेने पाहत असतात. मात्र याचे गांभीर्य सर्वच डॉक्टरांना असतेच असे नाही.
१८ हजार लोकसंख्येचे व राष्ट्रीय महामार्गालगत असलेले मोठे गाव म्हणून देवगाव रंगारीची परिसरात ओळख आहे. येथे असलेल्या आरोग्य केंद्रावर परिसरातील सुमारे २० गावे अवलंबून आहेत.
या आरोग्य केंद्रात दररोज विविध आजारांसाठी रुग्ण तपासणीसाठी येतात. येथील डॉक्टर दालनात बसतात. मात्र, येणाऱ्या रुग्णांना दालनाच्या खिडकीबाहेर उभे करून रुग्णाला हात न लावता फक्त तोंडी आजार विचारून नाममात्र औषधी लिहून देतात. याबाबत विचारणा केली तर, कोरोना संसर्गाचे कारण डॉक्टरांकडून दिले जात आहे. यामुळे गोरगरीब रुग्ण नाराजी व्यक्त करीत आहेत.
कोट...
कोरोनामुळे संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत म्हणून डॉक्टर रुग्ण तपासतात. खिडकीबाहेरून रुग्ण तपासले जात असेल, तर डॉक्टरांना सूचना देऊन याबाबत सुधारणा केल्या जातील.
डॉ. निलेश अहिरराव, वैद्यकीय अधीक्षक,
090921\img_20210909_103346.jpg
देवगाव रंगारी आरोग्य केंद्रात खिडकीबाहेरच्या रुग्णांना आतून तपासताना डॉक्टर.