कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षा पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:01 PM2020-09-30T12:01:24+5:302020-09-30T12:04:01+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम सत्राच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम सत्राच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नव्याने जाहीर केले जाईल, असे परीक्षा संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळविले. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात येणार होत्या. या परीक्षांना १ लाख ४८ हजार विद्यार्थी बसलेले आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगासाठी २४ सप्टेंबरपासून सुरू केलेल्या संपामुळे परीक्षा विभागात परीक्षेसंदर्भातील काम करण्यासाठी कर्मचारी हजर नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.
यासंदर्भात झालेल्या बैठकीला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, परीक्षा संचालक योगेश पाटील आदींसह अधिष्ठातांची उपस्थिती होती. परीक्षांचे वेळापत्रक आंदोलन संपल्यानंतरच जाहीर केले जाईल, असे सुत्रांनी सांगितले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि खा. डॉ. भागवत कराड यांनी भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खैरे यांनी दिले. यावेळी राजेंद्र जंजाळ, सचिन खैरे, गणू पांडे, डॉ. तुकाराम सराफ, हिरा सलामपुरे, संजय केणेकर, शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती.