उत्खनन करा अन् विसरा; सापडलेला इतिहास मातीत! पुरातत्व विभागाचा अजब कारभार

By संतोष हिरेमठ | Published: December 14, 2023 07:47 PM2023-12-14T19:47:47+5:302023-12-14T19:48:14+5:30

बीबी का मकबऱ्यासमोरील अवशेषाचे रहस्य कायम, फेब्रुवारीत बीबी का मकबरा परिसरात उत्खननाचे काम करण्यात आले होते.

Excavate and forget; Found history in the soil! Strange work of the Department of Archaeology | उत्खनन करा अन् विसरा; सापडलेला इतिहास मातीत! पुरातत्व विभागाचा अजब कारभार

उत्खनन करा अन् विसरा; सापडलेला इतिहास मातीत! पुरातत्व विभागाचा अजब कारभार

छत्रपती संभाजीनगर : उत्खनन करा आणि विसरून जा. पुन्हा काही दिवसांनंतर खोदकाम करा आणि सोडून द्या, पुरातत्व विभागाचा असाच काहीसा अजब कारभार पहायला मिळत आहे. बीबी का मकबरा परिसरात दोनवेळा खोदकाम करण्यात आले. येथे पुरातत्व अवशेष सापडले. परंतु, या अवशेषांचे रहस्य कायम असून, या जागेची सध्याची अवस्था पाहता सापडलेला इतिहास पुन्हा मातीत हरविल्याची परिस्थिती आहे.

२००५ ते २००९ या कालावधीतील अधीक्षकांनी बीबी का मकबऱ्यासमोरील जागेत काही पुरातत्व अवशेष असल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून खोदकाम करण्यात आले. एकदा नव्हे तर दोनदा खोदकाम करण्यात आले. या ठिकाणी पुरातत्व अवशेष सापडले खरे; परंतु या जागेची अवस्था पाहता पुरातत्व विभागाला एकाच जागेत वारंवार काम करण्यात रूची आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्खनन केलेल्या या जागेत आजघडीला मोठ्या प्रमाणात झाडीझुडपं वाढली आहेत.

केव्हा केव्हा केले उत्खनन?
- भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या छत्रपती संभाजीनगर सर्कल कार्यालयाकडून १४ सप्टेंबर २०२१ रोजी मकबऱ्यासमोरील उजव्या बाजूला असलेल्या उंचवट्यावर ४० मीटर बाय ४० मीटर परिसरात उत्खनन करण्यात आले होते. यातून समोरच्या भागात चार ते सहा फूट खोलपर्यंत उत्खनन करून मलबा हटविण्यात आला होता. तेव्हा विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष उघडे पडले. नंतर ते अर्धवट राहिले.
- त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये या ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू करण्यात आले. परंतु काही दिवसांत हे कामही थांबले. निधीअभावी काम रेंगाळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय आढळले?
उत्खननात या ठिकाणी मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया आदी अवशेष आढळले होते. त्याचा आणखी उलगडा करण्याकडे आणि या जागेचे जतन करण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Excavate and forget; Found history in the soil! Strange work of the Department of Archaeology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.