पाचोड परिसरातील सुकना नदीतून वाळूचा बेसुमार उपसा
By | Published: December 8, 2020 04:01 AM2020-12-08T04:01:58+5:302020-12-08T04:01:58+5:30
पाचोड : पैठण तालुक्यातील आडूळ शिवारातील घारेगाव व औरंगाबाद तालुक्यातील घारेगाव शिवारातून गेलेल्या सुकना नदीच्या पात्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर ...
पाचोड : पैठण तालुक्यातील आडूळ शिवारातील घारेगाव व औरंगाबाद तालुक्यातील घारेगाव शिवारातून गेलेल्या सुकना नदीच्या पात्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर अवैध प्रकारे वाळूचा उपसा सुरु आहे. यामुळे वाळूमाफियांचे चांगभले होत असून शासनाचा मात्र लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
जिल्ह्यात वाळूपट्ट्यांचा लिलाव झालेला नसतानाही वाळूमाफिया पोलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने सर्रास वाळू उपसा करुन वाहतूक करीत आहेत. सुखना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात उपसा होत असून रात्री अपरात्री वाहनांच्या जाण्या येण्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचीही पूर्णपणे वाट लागली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांची दिवसेंदिवस लूट सुरुच आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सुखना नदीव्यतिरिक्त पाचोड परिसरातील हिरडपुरी, टाकळी अंबड शिवारातून गेलेल्या गोदावरी नदीतूनही वाळूउपसा जोरात सुरु आहे.
चौकट
धमकी देऊन ट्रॅक्टर पळविले
चार दिवसांपूर्वी मंडळ अधिकारी भारती मादनकर यांनी घटनास्थळी जाऊन अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. मात्र, यावेळी वाळूमाफियांनी त्यांना धमकी देऊन ट्रॅक्टर पळवून नेला. यामुळे वाळूमाफिया किती मुजोर झाले आहेत, याची प्रचिती येते.