मराठवाड्यातील ६१ मंडळांत अतिवृष्टी; चौघांचा मृत्यू तर परभणीत २७६ गुरे वाहून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 12:17 PM2021-07-13T12:17:42+5:302021-07-13T12:22:52+5:30
परभणी-पाथरी, पूर्णा-नांदेड, ताडकळस-सिंगणापूर, ताडकळस-पूर्णा या मार्गावरील वाहतूक कच्च रस्ते वाहून गेल्याने ठप्प झाली होती.
औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. दरम्यान, नांदेड आणि परभणीत अतिवृष्टीची नोंद झाली असून नदी-नाले फुगले आहेत, अनेक गावांचा संपर्क तुटला. परभणी जिल्ह्यात पुरात वाहून गेलेल्या २७६ जनावरांचा मृत्यू झाला असून ७० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला तर नांदेड जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड या चार जिल्ह्यांतील ६१ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून वाहून गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांतही रिमझिम पावसाची नोंद झाली
मराठवाड्यात सलग पाचव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. परभणी-पाथरी, पूर्णा-नांदेड, ताडकळस-सिंगणापूर, ताडकळस-पूर्णा या मार्गावरील वाहतूक कच्च रस्ते वाहून गेल्याने ठप्प झाली होती. गंगाखेड तालुक्यात इंद्रायणी नदीला पूर आल्याने ७ गावांचा तर सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीला पूर आल्याने ११ गावांचा संपर्क तुटला होता. परभणी जिल्ह्यातील ७८ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, २०४ घरांची पडझड झाली. २५६ लहान तर २० मोठी जनावरे वाहून गेल्याने मरण पावली आहेत. परभणी शहरात २३२ मि. मी. पाासाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे. जिल्ह्यातील १६ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात पावसाने शहरी भागात नागरिकांची तारांबळ उडाली तर बळीराजा सुखावला. या पावसाने जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. ३१ मंडळात एकाच दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात पावसाने ताण दिल्याने बळीराजा चिंतित झाला होता. मात्र, दहा जुलैनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर खरीप पिकेही बहरली आहेत.
हिंगोली जिल्ह्यात ११ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या बाबुलाल मकरंद पवार (७०) रा. भटसावंगी तांडा यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. वसमत येथील रहिवासी नीलेश बच्चेवर (३५) हा आकोली येथे पुलावरून रविवारी रात्री दुचाकीसह वाहून गेला होता. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळला. बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १८.७ मि. मी. पाऊस पडला. जालना जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात सरासरी २०.७० मि. मी. पाऊस झाला. सर्वाधिक घनसावंगी तालुक्यात ३३.४० मि. मी. तर सर्वात कमी जाफराबाद तालुक्यात ९.६० मि. मी. पावसाची नोंद झाली.
मायलेकाचा मृतदेह सापडला
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार-असोला कोंडसीमार्गे औरंगाबादकडे जाणाऱ्या कारमधील चाैघांपैकी वर्षा योगेश पडोळ (३२, रा. औरंगाबाद) आणि श्रेयश योगेश पडोळ (४) मायलेकाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळला. रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास असोला गावाजवळील फर्ची पुलावरून पाणी वाहत असताना कार वाहून गेली हाेती.